Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन; नागपुरात घेतला अखेरचा श्वास

| Updated on: Jun 03, 2022 | 9:06 PM

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे पार्थीव शनिवारी 4 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायंकाळी 4.30 वाजता त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

Sudhir Mungantiwar | सुधीर मुनगंटीवार यांना पितृशोक, डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन; नागपुरात घेतला अखेरचा श्वास
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे निधन
Image Credit source: t v 9
Follow us on

चंद्रपूर : राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपुरातील प्रसिध्‍द डॉक्‍टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार (Sachchidanand Mungantiwar) यांचे आज 3 जून 2022 रोजी सायंकाळी 7.14 वाजता निधन झाले. नागपूर येथील किंग्‍जवे या रुग्‍णालयात (Kingjave Hospital) त्‍यांनी अखेरचा श्‍वास घेतला. डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे मृत्‍युसमयी 91 वर्षाचे होते. हृदय विकाराने त्यांचे निधन झाले. राष्‍ट्रीय स्‍वयंसेवक संघाचे (Rashtriya Swayamsevak Sangh) विभाग संघचालक, लोकमान्‍य टिळक स्‍मारक मंडळाचे अध्‍यक्ष, चिन्‍मय मिशनचे अध्‍यक्ष, डॉ. हेडगेवार जन्‍मशताब्‍दी सेवा समितीचे अध्‍यक्ष अशा विविध जबाबदाऱ्या त्‍यांनी समर्थपणे सांभाळल्‍या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनसंघ यांच्या जबाबदाऱ्या त्यांनी सक्षमपणे सांभाळल्या होत्या. त्यांचा राजकीय वारसा सुधीर मुनगंटीवार यांनी पुढं नेला. शिवाय दुसरा मुलगा डॉ. संदीप मुनगंटीवार हे आरोग्य सेवा करतात. दोन्ही मुलं त्यांचा वारसा समर्थपणे चालवत आहेत.

सुधीर मुनगंटीवार यांचे वडील

1967 मध्‍ये डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांनी भारतीय जनसंघातर्फे चंद्रपूर विधानसभेची निवडणूक देखील लढली होती. विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार हे त्‍यांचे ज्‍येष्‍ठ चिरंजीव तर चंद्रपुरातील प्रसिध्‍द नेत्रतज्ज्ञ डॉ. संदीप मुनगंटीवार हे त्‍यांचे कनिष्‍ठ चिरंजीव होत. त्‍यांच्‍या पश्‍चात दोन मुले, मुलगी सुचिता चकनलवार, स्‍नुषा, जावई, नातवंड असा मोठा आप्‍तपरिवार आहे. याशिवाय फार मोठा वारसा ठेवून सच्चिदानंद मुनगंटीवार यांना देवाज्ञा झाली.

शनिवारी शांतीधाम येथे अंत्यसंस्कार

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे पार्थीव शनिवारी 4 जून 2022 रोजी सकाळी 10.30 वाजता चंद्रपूर येथे आणण्‍यात येईल. त्‍यांची अंत्‍ययात्रा सायंकाळी 4.30 वाजता त्‍यांच्‍या कस्‍तुरबा चौक निवासस्‍थानाहून निघेल. शांतीधाम येथे त्‍यांच्‍यावर अंत्‍यसंस्‍कार करण्‍यात येतील.

हे सुद्धा वाचा

साधी राहणी, उच्च विचार

डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार हे संघाशी एकनिष्ट होते. रुग्णांवर कमी पैशात उपचार देत होते. बालाजी वॉर्डात त्यांचे रुग्णालय होते. बरेच वर्षे त्यांनी रुग्णसेवा केली. मुलगा मंत्री झाला तरी त्यांची राहणी अतिशय साधी होती. गरजू रुग्णांना ते मोफतही सेवा द्यायचे.