450 वर्षांची परंपरा असलेले ढाल पूजन, गोंड, गोवारींचा सांस्कृतिक वारसा काय?

| Updated on: Oct 27, 2022 | 5:11 PM

ढाल पूजन कार्यक्रमाच्या वेळी एका बासावर चंदनाच्या लाकडाची कोरलेली चार मुखी ढाल लावली जाते.

450 वर्षांची परंपरा असलेले ढाल पूजन, गोंड, गोवारींचा सांस्कृतिक वारसा काय?
गोंड, गोवारींचा सांस्कृतिक वारसा काय
Image Credit source: tv 9
Follow us on

चंद्रपूर : भिमणी येथे गायगोधन व ढाल पूजनाचा कार्यक्रम पार पडला. या गोंड, गोवारी (Gowari) समाजाच्या परंपरेला 450 वर्षांचा ऐतिहासिक व सांस्कृतिक (Cultural) वारसा लाभलेला आहे. गायी राखणे हा गोंड गोवारी समाजाचा पारंपरिक व्यवसाय. लोकं गायीची भक्तीभावाने पूजा करून कृतज्ञता व्यक्त करतात. 450 वर्षांपासून सांस्कृतिक वारसा लाभलेली परंपरा भक्तिभावाने जोपासल्या जात आहे.

ढाल पूजन कार्यक्रमाच्या वेळी एका बासावर चंदनाच्या लाकडाची कोरलेली चार मुखी ढाल लावली जाते. त्या ढालीला मोरपंख व नवीन फडकं लावून त्याची विधिवत पूजा केली जाते.

गोंड, गोवारी जमातीचे लोकं दैवत असलेल्या वाघोबा, नागोबा मूर्तीची पूजा करतात. ही ढाल मिरवणूक या गावातीलच जमातीचे माहेरघर असलेल्या परिसरात काढण्यात आली. गावातील आत्राम यांचे घरी विधिवत पूजा अर्चा व ढालीला पाणी अर्पन करण्यात आले.

पुन्हा गावातून समाजाचे पारंपरिक टिपऱ्या नृत्य करीत मिरवणूक काढण्यात येते. रॅली, मिरवणूक, संस्कृती, कला, इतिहास, कौशल्य, परंपरा, लाठीकला, पारंपरिक नृत्य यात यांचा समावेश होता.

पाच दिवसाच्या दिवाळीत गोवर्धन पूजा केली जाते. गावातील आकरावर शेणाचा गोळा जमा केला जातो. त्यावरून गायी-म्हशींना नेलं जाते. मुलांनाही त्यात लोळविण्याची प्रथा काही ठिकाणी आहे.

ढाल हे विजयाचे प्रतीक आहे. परंपरेनुसार ती जोपासली जाते. दिवाळीत पूर्व विदर्भात गावोगावी ढालीचे पूजन केले जाते. ही परंपरा काही लोकं जोपासत आहेत. कारण गायीला आपल्या धर्मात महत्त्वाचा दर्जा आहे.

ढाल पूजन ही गोवारी समाजाची परंपरा आहे. लांब काठी असते. मोरपीस असते. गोंड गोवारी हे निसर्गदेवतेचे पूजक आहेत. ढालीची रात्रीच्या वेळी पूजा केली जाते, अशी माहिती एकोडी जिल्हा परिषद क्षेत्राच्या सदस्या माहेश्वरी नेवारे यांनी दिली.

आदिवासी गोवारी जमातीत ढाल पूजनाला विशेष महत्त्व आहे. आद्य धर्मगुरू कोपाल लिंगो व माता जंगो रायतार यांना देवाच्या रुपात ढाल बनवून पूजतात. आद्य धर्मगुरू कोपाल लिंगो देवाची ढाल ही दोन मुखी प्रतिकात तर माता जंगो रायतार देवीची ढाल चार मुखी प्रतिकात असते.

ढाल पूजन कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती करतात. ज्याच्या घरी ढाल आहे त्यांच्या घरी काटसावरीचे झाड असते. घरी काटसावरीचे झाड नसेल तर त्या झाडाची डेर (फांदी) तोडून घरी आणतात व ते अंगणात पुरतात. ढालीचा खांब हा तीस ते चाळीस फूट लांबीचा असतो.