गडचिरोलीतील या मार्गावर आदिवासींचा ठिय्या; प्रशासनाविरोधात रोष असण्याचे कारण काय?

| Updated on: Mar 27, 2023 | 8:51 AM

आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला प्रशासन नक्षलवादी ठरवत आहे, असा नाराजीचा सूर देखील कार्यक्रमात उमटला. शासनाला खरंच या परिसराचा विकास करायचा असेल तर आधी शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधा निर्माण कराव्या.

गडचिरोलीतील या मार्गावर आदिवासींचा ठिय्या; प्रशासनाविरोधात रोष असण्याचे कारण काय?
Follow us on

गडचिरोली : जिल्ह्यातील दक्षिण भागातल्या दंडकारण्य परिसरात रस्ता बांधकाम आणि खाणीवरून असंतोष पसरला आहे. मागील पंधरा दिवसांपासून तोडगट्टा येथे सुरू असलेल्या आंदोलनाने मोठे रूप घेतले. प्रशासन जोपर्यंत इथे येऊन आमच्याशी संवाद साधणार नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार आदिवासींनी व्यक्त केला आहे. रविवारी आंदोलनस्थळी आसपासच्या ग्रामसभेतील पाच हजाराहून अधिक आदिवासी नागरिकांनी उपस्थिती दर्शवली.

एटापल्ली तालुक्यातील नक्षलग्रस्त असलेल्या तोडगट्टा या गावात मागील पंधरा दिवसांपासून प्रशासनाविरोधात आंदोलन सुरू आहे. छत्तीसगड आणि महाराष्ट्राच्या सीमेवर चालू असलेले रस्ता बांधकाम बंद करण्यात यावे, ही येथील आदिवासींची मुख्य मागणी आहे. त्यांच्या मते या परिसरातील दमकोंडवाही येथील प्रस्तावित लोहखाण सुरू करण्यासाठी प्रशासनाने पूर्व तयारी चालू केली आहे.

हे सुद्धा वाचा

गट्टा ते तोडगट्टा आणि पुढे छत्तीसगडला जोडणारा रस्ता बांधण्यात येऊ नये असे आंदोलकांचे म्हणणे आहे. दमकोंडवाही बचाव कृती समिती आणि पारंपरिक सूरजागड इलाका समिती या आंदोलनाचे नेतृत्व करीत आहे. रविवारी या भागातील ७० आणि लगतच्या छत्तीसगड येथील ३० ग्रामसभेतील प्रतिनिधी तसेच नागरिक उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्याच्या सुविधा निर्माण कराव्यात

आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला प्रशासन नक्षलवादी ठरवत आहे, असा नाराजीचा सूर देखील कार्यक्रमात उमटला. शासनाला खरंच या परिसराचा विकास करायचा असेल तर आधी शिक्षण, आरोग्य सारख्या सुविधा निर्माण कराव्या. पण केवळ खाणीसाठी ते रस्ता निर्माण करून हा परिसर उध्वस्त करणार असा आरोप यावेळी करण्यात आला.

दुसरीकडे दमकोंडवाही खाणीसंदर्भात शासन दरबारी कुठलाही प्रस्ताव नाही. हा रस्ता नागरिकांच्या सुविधेसाठी निर्माण करण्यात येत असल्याचे प्रशासनाचे मत आहे. गडचिरोलीहून छत्तीसगडला जोडणाऱ्या गट्टा -तोडगट्टा मार्गावर हजारो आदिवासींचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

अंगणवाडी, रुग्णालय बांधा

या भागातून खनिज वाहतुकीसाठी होणाऱ्या नव्या महामार्गाच्या बांधकामाला विरोध केला. या भागात पूल- रस्ते -पोलीस कॅम्प नको तर रुग्णालय- अंगणवाडी बांधा ही प्रमुख मागणी आहे. या भागातील आदिवासी जीवन आणि नैसर्गिक विविधता तसेच आदिवासी परंपरा नष्ट होण्याची व्यक्त केली जात आहे.