इंडिगोचा ‘हवे’तला कारभार… नव विवाहित जोडप्याचं ऑनलाईन रिसेप्शन, तर दोन भाऊ कित्येक वर्षांनी भेटले…
Indigo : इंडिगोची अनेक विमाने रद्द झाली आहेत. विमानसेवा कोलमडल्याने अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. एक नव विवाहित जोडपं आपल्या रिसेप्शनला हजर राहू शकलेले नाही.

इंडियो एअरलाइन्सच्या प्रवाशांचे गेल्या 3-4 दिवसांपासून हाल सुरू आहेत. इंडिगोची अनेक विमाने रद्द झाली आहेत, तर काही विमाने उशिराने उड्डाण करत आहेत. यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विमानसेवा कोलमडल्याने अनेक प्रवाशांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता इंडिगोच्या या भोंगळ कारभारामुळे अनेक लोकांना नियोजित कार्यक्रमांना हजर राहता आलेले नाही. एक नव विवाहित जोडपं आपल्याच रिसेप्शनला हजर राहू शकलेले नाही. तर दुसरीकडे इंडिगोच्या या कारभारामुळे दोन भावांची भेट घडून आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
अनेक उड्डाणे रद्द
इंडिगोच्या विमानांमध्ये वैमानिकांची कमतरता असल्याने देशभरातील उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. याचा फटका एका नव विवाहित जोडप्याला बसला आहे. इंडिगो एअरलाइन्सची फ्लाईट रद्द झाल्यामुळे वधू-वर येऊ शकले नाहीत म्हणून त्यांना रिसेप्शनला ऑनलाइन हजर रहावे लागले. हुबळी येथील गुजरात भवनमध्ये ही घटना घडली.
ऑनलाईन रिसेप्शन
हुबळी येथील मेधा क्षीरसागर आणि भुवनेश्वर येथील संगमा दास हे बेंगळुरूमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. या जोडप्याने 23 नोव्हेंबर रोजी भुवनेश्वरमध्ये लग्न केले. गेल्या बुधवारी वधूचे मूळ गाव हुबळी येथे रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले होते. कुटुंबाने हुबळी येथील गुजरात भवनमध्ये यासाठी सर्व तयारी केली होती. वधू-वरांनी 2 डिसेंबर रोजी भुवनेश्वरहून बंगळुरूवरून हुबळीला जाण्यासाठी विमान बुक केले होते. 2 डिसेंबर रोजी विमान लेट आणि 3 डिसेंबरला पहाटे 4-5 वाजेपर्यंत विमान उशिरा सुरू झाले. त्यामुळे हे जोडपं पोहोचू शकलं नाही. त्यामुळे या रिसेप्शन कार्यक्रमाला वधू वर ऑनलाइन (व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे) सहभागी झाले होते.
फ्लाईट रद्द झाल्यामुळे दोन भावांची भेट
आणखी एका घटनेत एक व्यक्ती फ्लाईट रद्द झाल्यामुळे सुरतऐवजी मुंबईला पोहोचला. हरिहरन नावाचा एक प्रवासी लग्नासाठी सुरतला जात होता पण त्याची फ्लाईट रद्द झाली आणि तो मुंबईला पोहोचला. मुंबई विमानतळावर पोहोचल्यावर त्याला त्याचा भाऊ सापडला, जो त्याने गेल्या अनेक वर्षांपासून पाहिला नव्हता. हरिहरनच्या भावाची फ्लाइट देखील रद्द झाली होती. हरिहरन याबद्दल बोलताना म्हणाले की, ‘हे देवामुळे घडले, मी लग्नाला जाऊ शकलो नाही मात्र मला माझ्या भावाला भेटता आले.’
