Chandrapur Tiger Attack: वाघांच्या हल्ल्यांनी चंद्रपूर हादरले, एकाच दिवशी तिघांवर हल्ला, दोघांचा बळी, एक गंभीर जखमी
Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात एकाच दिवशी वाघाचे तीन हल्ले, दोघांचा मृत्यू तर एक गंभीर जखमी झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगलाच्या जवळपासच्या गावात वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत.

Chandrapur Tiger Attack: चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या एका आठवड्यात तीन जणांचा वाघांच्या हल्ल्यात मृत्यू झाला असतानाच आज वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी पुन्हा एकदा खळबळ उडवली आहे. एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी वाघाने हल्ले केले असून या मधे दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांपासून जंगलाच्या जवळपासच्या गावात वाघांच्या हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. यामुळे सध्या जिल्ह्यात भीतीचे वातावरण आहे.
वाघाच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये वाढ
पहिल्या घटनेत चिमूर तालुक्यातील गरडापार येथील ५५ वर्षीय सदाशिव खडसंग यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. तर दुसऱ्या घटनेत सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे शेतात काम करत असताना ७० वर्षीय शेतकरी पत्रुजी मेश्राम यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. तर पोंभुर्णा तालुक्यातील सातारा तुकूम परिसरात गायी चारण्यासाठी जंगलात गेलेल्या ६० वर्षीय राजेश्वर सिडाम यांच्यावर वाघाने हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनांमुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी जोर धरत आहे.
तो वाघ अखेर जेरबंद
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातील पळसगाव वनपरिक्षेत्रात दहशत निर्माण करणाऱ्या आणि एका महिलेचा जीव घेणाऱ्या टी-१७९ (एसएम-१) वाघाला अखेर वनविभागाच्या पथकाने यशस्वीरित्या जेरबंद केले आहे. पळसगाव बीट अंतर्गत येणाऱ्या गोंडमोहाळी कक्ष क्रमांक ५५८ मध्ये ही कारवाई करण्यात आली. या वाघाच्या जेरबंद होण्याने परिसरातील ग्रामस्थांनी अखेर सुटकेचा श्वास घेतला आहे.
१६ ऑक्टोबर रोजी याच वाघाने पळसगाव येथील उषा अंकुश गुरनुले यांच्यावर जीवघेणा हल्ला करत त्यांचा बळी घेतला होता. या घटनेमुळे पळसगाव व परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि दहशतीचे वातावरण पसरले होते. नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर जेरबंद करण्यात आलेल्या या वाघाला पुढील वैद्यकीय तपासणी, उपचारासाठी आणि आवश्यक त्या कार्यवाहीसाठी तात्काळ चंद्रपूर येथील ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये रवाना करण्यात आले आहे.