IND vs UAE: युएईसारख्या दुबळ्या संघासमोरही टीम इंडिया टिकू शकली नाही, पराभवाच्या धक्का अन् थेट…
IND vs UAE Match Result: भारत आणि दुबईमध्ये सामना रंगला जो भारतीय संघाने गमावला पण कसा ते जाणून घ्या...

IND vs UAE Match: नुकताच भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध सामना गमावला. यामुळे भारतीय संघाची आधीच नाचक्की होत होती, यातच आता भारतीय संघाचा युएईकडून ६ गडी राखून पराभूत झाला. हाँगकाँग सिक्सर्स स्पर्धेतील भारताचा हा सलग दुसरा पराभव असल्याने आता चिंतेची बाब उपस्थित होत आहे. प्रथम फलंदाजी करताना, कृणाल पांड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने निर्धारित ६ षटकांत ९४ धावा केल्या. युएईच्या फलंदाजांनी धुमाकूळ घालत अवघ्या २६ चेंडूंमध्ये सामना संपवला. भारतासाठी टी. नटराजनने १४ चेंडूंमध्ये ३८ धावा केल्या.
भारतीय संघाचे सर्वच फलंदाज अपयशी ठरले. नितीश राणा, राहुल त्रिपाठी आणि राहुल तेवतिया, हे सर्व दिग्गज खेळाडू पाकिस्तानविरुद्ध अपयशी ठरले होते. युएईविरुद्धही त्यांच्यापैकी कोणीही चांगली कामगिरी केली नाही. नितीशने केवळ ६ धावा केल्या, तर राहुल तेवतिया आणि शशांक सिंग प्रत्येकी एका धावेवर बाद झाले. ३८ धावा करणाऱ्या नटराजनमुळे भारताची धावसंख्या ६०-६५ पर्यंत मर्यादित राहिली असती.
९५ धावांचे लक्ष्य गाठताना, युएई संघाने पहिल्या षटकापासूनच धुमाकूळ घातला आणि केवळ ४.२ षटकांतच सामना संपवला. खालिद शाहने टी. नटराजनच्या पहिल्या षटकात २५ धावा दिल्या. त्यानंतर, दुसऱ्या षटकात शशांक सिंगनेही पहिल्या तीन चेंडूंवर दोन षटकारांसह १६ धावा दिल्या, पण त्याने शेवटच्या तीन चेंडूंवर एकही धाव न देता जोरदार पुनरागमन केले.
शशांक सिंगने दुसऱ्या षटकात निर्माण केलेला दबाव तिसऱ्या षटकात नितीश राणाने २४ धावा दिल्यावर कमी झाला. खालिद शाह आणि अंश टंडन भारतीय गोलंदाजांना चोप देत होते. आता चौथ्या षटकात धावा रोखण्याची जबाबदारी टी. नटराजनवर होती, पण त्यानेही आपल्या दुसऱ्या षटकात १९ धावा दिल्या.
पहिल्या सामन्यात कृणाल पांड्याच्या एका षटकात सलग ५ षटकार ठोकले गेले होते. युएईविरुद्ध गोलंदाजीसाठी आल्यावर खालिद शाहने त्याच्या दोन्ही चेंडूंवर षटकार मारून ४.२ षटकांतच सामना संपवला. पाकिस्ताननंतर युएईसारख्या दुबळ्या संघासमोरही भारतीय संघाला आपला ठसा उमटवता आला नाही. पराभवाच्या धक्कासोबत भारतीय संघ आता स्पर्धेतून बाहेर पडला आहे.
