‘आमने सामने’च्या वादावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले; रातोरात त्यांना काढून टाकणं..
'आमने सामने' या नाटकावरून सुरू असलेल्या वादावर आता महेश मांजरेकर यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. सात वर्षे साथ दिल्यानंतर रोहन आणि केतकीला अशाप्रकारे काढणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलंय.

मराठी रंगभूमीवरील ‘आमने सामने’ या नाटकाच्या वादाने आता वेगळं वळण घेतलं आहे. या नाटकातील कलाकारांना अचानक कामावरून काढल्याच्या चर्चांदरम्यान अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. रोहन गुजर आणि केतकी पालव यांनी सात वर्षे कठीण परिस्थितीत साथ दिल्यानंतर त्यांच्याशी अशा प्रकारे वागणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. एका मुलाखतीत बोलताना त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे. याप्रकरणी कलाकार आणि निर्मात्यांनी एकत्र बसून चर्चा करण्याचा सल्लाही दिला आहे.
नाटकातून काढून टाकल्यानंतर रोहन आणि केतकी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर लीना भागवत आणि मंगेश कदम यांनीसुद्धा व्हिडीओ पोस्ट करत त्यांची बाजू मांडली होती. याविषयी महेश मांजरेकर म्हणाले, “मी ते दोन्ही व्हिडीओ पाहिले. त्यांना असं काढणं अयोग्य असल्याचं मला वाटतं. सात वर्षे तुम्ही सोबत काम करत होते. या नाटकाला मी फॉलो केलंय. फॉलो केलंय म्हणजे.. आधी नाटक चालत नव्हतं, मग त्यांनी ते बंद केलं. परत सुरू केलं तेव्हा कोविड आला. त्यांनी पण म्हणजे लीना भागवत आणि मंगेश कदम यांनी खूप वाईट परिस्थितीतून या नाटकाला तगवलंय. आधी निर्माते दुसरे होते, मग यांनी ठरवलं की आपणच करुयात. पण त्या सात वर्षांत ते (रोहन आणि केतकी) होते ना तुमच्यासोबत. कितीही समस्या असली तरी त्यांनी तुमची साथ दिली ना. माझ्या मते, हे प्रकरण विचारपूर्वक हाताळता येऊ शकलं असतं. आता मला माहित नाही की त्यांनी किती अव्वाच्या सव्वा पैसे मागितले. पण नाटक धो-धो चालतंय. त्यातही चारच पात्र आहेत.”
“माझं म्हणणं आहे की, तुम्ही त्यांना बसवून सांगू शकले असता की, हे पहा आम्हाला मानधनवाढ करणं शक्य होणार नाही. तुम्हाला जर पुढे हे नाटक करायचं नसेल तर मग आपण दुसरा पर्याय शोधू. तोपर्यंत तुम्ही काही प्रयोग करा, मग आम्ही दुसरे कलाकार शोधू. पण रातोरात त्यांना सांगणं की उद्यापासून नाटक करू नका, हे खूपच अयोग्य होतं. त्यांनी सात वर्षे तुमची साथ दिली होती. मी पैशांचंही काही म्हणत नाही, पण वाईट परिस्थितीत साथ दिल्यानंतर नाटक चांगलं चालू असताना असं करणं योग्य वाटत नाही. मला त्याचं वाईट वाटलं,” असं ते पुढे म्हणाले.
लीना यांच्या कामाचं कौतुक करत ते म्हणाले, “लीनाला मी म्हटलं होतं, तू जगात भारी आहेस. ती जे त्या नाटकात काम करते, ते हिंदीतल्या एकाही कलाकाराने करून दाखवावं. रोहन गुजर आणि केतकी पालव दोघंही त्यांना तितकीच साथ देतात. जमलं तर त्यांनी बसावं एकत्र आणि चर्चा करावी, असं मला वाटतं.”
