Palash Muchhal: पलाश मुच्छलच्या अडचणीत वाढ; स्मृती मंधानाच्या बालमित्राने दिला मोठा इशारा, थेट फौजदारी कारवाई..
Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल याने स्मृती मंधानाचा बालमित्र विज्ञान माने यांच्याविरोधात दाखल केलेला मानहानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे. यानंतर विज्ञान माने यांनी थेट फौजदारी कारवाई सुरू करणार असल्याचं सांगितलं आहे.

Palash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल आणि भारतीय क्रिकेटपटू स्मृती मंधाना यांच्या मोडलेल्या लग्नाची चर्चा अद्याप थांबलेली नाही. आता या प्रकरणात आणखी एक मोठी घडामोड समोर आली आहे. मराठी अभिनेता, निर्माता आणि स्मृती मंधानाचा बालमित्र विज्ञान माने यांनी पलाश मुच्छलविरोधात फौजदारी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. पलाशने दाखल केलेला मानहानीचा खटला मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळल्याचा दावा विज्ञान यांनी केला आहे. या निर्णयानंतर त्यांनी कायदेशीर लढाई पुढे नेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
विज्ञान माने यांनी पलाश मुच्छलवर चित्रपट निर्मितीच्या नावाखाली 40 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता. विज्ञान यांच्या म्हणण्यानुसार, डिसेंबर 2023 मध्ये सांगली इथं त्यांची पलाशशी भेट झाली होती. त्यानंतर पलाशच्या ‘नजरिया’ या चित्रपटासाठी त्यांनी पैसे गुंतवले. मार्च 2025 पर्यंत त्यांनी चित्रपटासाठी 40 लाख रुपये दिल्याचा विज्ञान यांचा दावा आहे. मात्र, चित्रपट पूर्ण झाला नाही आणि गुंतवलेली रक्कमही परत मिळाली नाही, असा आरोप त्यांनी केला. या आर्थिक व्यवहारावरून दोघांमधील वाद वाढला आणि प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचलं.
विज्ञान यांनी पलाशविरोधात केलेल्या आरोपांनंतर पलाशने त्यांच्यावर दहा कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयाने हा खटला फेटाळल्याचा दावा विज्ञान यांनी केला आहे. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना विज्ञान म्हणाले की, न्यायालयाच्या या निर्णयातून एक महत्त्वाचा संदेश मिळतो. केवळ प्रसिद्धी मिळवण्यासाठी कोणावरही खोटे आणि निराधार खटले दाखल करू नयेत. कायद्यापुढे कोणीही मोठे नाही आणि न्यायालयीन प्रक्रियेचं पालन करणं प्रत्येकासाठी आवश्यक आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
या प्रकरणात आता आपण पुढील कायदेशीर पावलं उचलणार असल्याचं विज्ञान यांनी सांगितलं. पलाशने आतापर्यंत सांगितलेल्या कथित खोट्या गोष्टी लोकांसमोर आणण्याचा आपला प्रयत्न असंल, असंही त्यांनी म्हटलं. यासोबतच, या प्रकरणातील सत्य त्याच्या कुटुंबीयांपर्यंत पोहोचवायचं असल्याचं विज्ञान यांनी सांगितलं. योग्य न्यायालयीन आणि फौजदारी कारवाई लवकरच सुरू करणार असून, सर्व प्रक्रिया कायदेशीर मार्गानेच पार पाडणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, पलाशच्या कायदेशीर टीमने या नव्या घडामोडींवर प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या प्रकरणात पुढे काय घडणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
