कामगार कामात मग्न होते, इतक्यात मोठा आवाज झाला, पाहता पाहता गोडाऊनमध्ये आगडोंब

| Updated on: May 13, 2023 | 9:31 PM

नेहमीप्रमाणे कारखान्यात कामगार काम करत होते. इतक्यात मोठा आवाज झाला. पण काय झाले हे कळायच्या आतच गोडाऊनमध्ये अग्नीकल्लोळ उठला आणि होत्याचं नव्हतं झालं.

कामगार कामात मग्न होते, इतक्यात मोठा आवाज झाला, पाहता पाहता गोडाऊनमध्ये आगडोंब
फायर बॉल बनवणाऱ्या गोडाऊनला आग
Image Credit source: TV9
Follow us on

कुणाल जयकर, TV9 मराठी, अहमदनगर : आग विझवण्याचा फायरबॉल बनवणाऱ्या गोडाऊनमध्ये आग लागून दोघांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना अहमदनगरमधील जामखेड येथे नगर रोडवर घडली आहे. या घटनेत एक जण जखमी झाला आहे. कारखान्यात काम सुरु असतानाच लाईटच्या शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज प्राथमिक तपासात वर्तवण्यात आला आहे. या घटनेमुळे जिल्हात एकच खळबळ उडाली आहे. ज्ञानेश्वर चंद्रकात भोडवे आणि जहीर सत्तार मूलानी अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. जामखेड येथील नगररोड वरील सावळेश्वर ट्रॅक्टरच्या मागील बाजूस मालक पंकज शेळके यांचे रेडमॅटीक ऑटोमॅटीक नावाचे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये फायर फायटरचे उत्पादन करण्यात येते. या आग विझवण्याच्या फायरबॉल गोडाऊनमध्ये अचानक आग लागली.

शॉर्टसर्किटमुळे आग लागली

कामगार ज्ञानेश्वर चंद्रकात भोंडवे आणि जहीर सत्तार मुलानी हे दोन कामगार काम करत होते. तर इतर दोघे गोडाऊनच्या बाजूला उभे होते. यावेळी अचानक या गोडाऊनला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यानंतर जेसीबीच्या सहाय्याने या गोडाऊनला पाठीमागून भगदाड पाडण्यात आले. गोडाऊनमधून धुराचे मोठे लोळ बाहेर येत होते. तसेच आतमध्ये असलेल्या फायरबॉलमध्ये आगीमुळे स्फोट होत होते. या स्फोटांच्या आवाजाने आजुबाजूचे लोक धावत बाहेर आले मात्र धुराचा लोळ प्रचंड होता. तर अधून-मधून होणारे स्फोट यामुळे कोणासही गोडाऊनमध्ये आत जाता आले नाही.

आगीत दोघांचा मृत्यू

आग लागल्यानंतर गोडाऊनमधून बाहेर पडता न आल्याने दोघांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच जामखेड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशामक दल आणि स्थानिक नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अखेर दीड तासानंतर आग आटोक्यात आणण्यास अग्नीशामक दलाला यश आले आहे.

हे सुद्धा वाचा