Pankaja Munde : नवरात्रीत नवा संकल्प जाहीर करणार… पंकजा मुंडेंची गोपीनाथ गडावरून मोठी घोषणा; भारूड म्हणताना भावूक
गोपीनाथ मुंडेंच्या स्मृतिदिनी पंकजा मुंडेंनी गडावरून मोठी घोषणा केली. नवरात्रीत त्या 'नवा संकल्प' जाहीर करणार आहेत, जो तुटलेल्या कड्या जोडणारा असेल, राजकारण करणारा नाही. भारूड गाताना त्या भावूक झाल्या. त्यांनी पर्यावरणाचा संदेश दिला आणि 12 डिसेंबरला ऊसतोड कामगारांसोबत काम करण्याची ग्वाही दिली.

लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचा आज स्मृती दिन आहे. या निमित्ताने गोपीनाथ गडावर विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. भजन आणि कीर्तनही ठेवण्यात आलं आहे. यावेळी पंकजा मुंडे या भारूड गाताना भावूक झाल्या. त्यानंतर त्यांनी गोपीनाथ गडावर आलेल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला. येत्या नवरात्रीत मी मोठा संकल्प करणार आहे. हा तुटलेल्या कड्या जोडणारा असणार आहे. राजकारण करणारा नसेल, अशी घोषणाच पंकजा मुंडे यांनी केली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे नवरात्रीत काय घोषणा करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पंकजा मुंडे यांनी यावेळी काही संकल्प करण्याचे आवाहन केलं. एक पेड बाप के नाम, असा माझा आजचा संकल्प आहे. मुंडे साहेबांवर प्रेम करणाऱ्यांना मी आज रोप देणार आहे. मुंडे साहेबांची मान स्वर्गात उंचावली पाहिजे, असा मुंडे साहेबांचा प्रत्येक मावळा लढला पाहिजे, आपण फक्त नीट बोलणारे नाही, साखर घालणारे माणसं आहोत. दोन घास कमी खा आपण स्वाभिमानी रहा, हा एक संकल्प आहे. माझा आणखी एक संकल्प आहे, तो मी नवरात्रीत जाहीर करेल. तो संकल्प सगळ्या तुटलेल्या कड्या जोडण्यासाठी असेल. राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. तो नवरात्रीत मी तुम्हाला सांगेल, असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मोदींनी यायला पाहिजे
गोपीनाथ गडावर अमित शाह येऊन गेले आहेत. या गडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यायचे राहिले आहेत. त्यांनी एकदा तरी या गडावर यावं ही माझी इच्छा आहे, अशी भावनाही पंकजा मुंडे यांनी बोलून दाखवली.
तुमच्या पेक्षा कोणतीही संपत्ती मोठी नाही
मुंडे साहेबांनी जाती धर्माच्या भिंती पाडल्या. आमचं तुमचं नातं रक्तापेक्षा श्रेष्ठ आहे. जेवढे प्रेम तुम्ही मुंडे साहेबांवर करता तेवढी मी कर्जबाजारी होते. तुम्ही जेवढे प्रेम करता, तेवढे जोडे उचलायची क्षमता माझ्यामध्ये येते. तुमच्या पेक्षा कोणतीही मोठी संपत्ती नाही, हे वैद्यनाथाची आणि मुंडे साहेबांची शपथ घेऊन सांगते, असं त्या म्हणाल्या.
ऊस तोडणार, ट्रॅक्टर चालवणार
आज सर्वांसाठी वेदनेचा आणि दुःखाचा दिवस आहे. मी माध्यमांचे आभार व्यक्त करते, इतक्या गरमीत तुम्ही इथे आला आहात. तुम्ही 12 वर्षापासून इथे येत आहात. मी स्वतः ट्रॅक्टर चालवणार आहे. 12 डिसेंबरला सकाळी 5 वाजता उठून इथल्या कार्यक्रमाआधी ऊसतोड कामगारांसोबत ऊस तोडणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.
आज पर्यावरणाची कठीण परिस्थिती आहे आणि ते खातं माझ्याकडे आहे. तुमच्या घरात वाढदिवस असेल, दुःख झाले असेल, तुम्ही एक झाड लावा. शेतकऱ्यावर अन्याय झाल्यावर मुंडे साहेब लढत होते. कर्जमाफी मुंडे साहेबांनी दिली. रासायनिक नसलेली शेती मी आता करणार, असंही त्या म्हणाल्या.
भावनिक झाल्या
दरम्यान, पंकजा मुंडे आज भावनिक झालेल्या दिसल्या. पंकजा मुंडे भजनात रमल्या होत्या. हातात विना घेऊन त्या भजनात रमल्या होत्या. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्यावरील भारुड म्हणताना पंकजा मुंडे भावनिक झाल्याचं दिसून आलं.