
Parth Pawar Pune Land Scam : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्यावर कोट्यवधी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवार यांच्या कंपनीने पुण्यातील महार वतनाची 1800 कोटी रुपयांची जमीन अवघ्या 300 कोटी रुपयांत खरेदी केल्याचा आरोप आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर आता राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील या आरोपांची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणी चौकशी केली जाईल. कोणी दोषी आढळल्यास कडक कारवाई केली जाईल, अशी भूमिका घेतली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर टीकेची झोड उठल्यानंतर पार्थ पवार यांची भूमिका समोर आली आहे. मी कोणताही घोटाळा केलेला नाही, असे पार्थ पवार म्हणाले आहेत.
सध्या समोर आलेले हे प्रकरण पुण्यातील जमिनीचे असून पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेली ही जमीन महार वतनाची आहे. या जमिनीची किंमत सध्याच्या बाजारमूल्यानुसार 1800 कोटी रुपये आहे. ही जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या 300 कोटी रुपयांत खरेदी केली आहे, असा आरोप आहे. विशेष म्हणजे 1800 कोटींची जमीन फक्त 300 कोटींमध्ये खरेदी केली असून त्यासाठी फक्त 500 रुपयांचे मुद्रांक शुल्क भरलेले आहे, असाही दावा करणयात आला आहे. यासह मुळ मालकांना विश्वासात न घेता, सातबारा क्लिअर न करता हा सर्व व्यवहार झाला आहे, असाही आरोप करण्यात आला आहे. पार्थ पवार यांनी ही जमीन मुळ मालकांना परत करावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. परंतु पार्थ पवार यांनी मात्र या आरोपांप्रकरणी त्यांचे मत मांडले आहे.
पुण्याचा हा जमीन व्यवहार वादात सापडल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण समोर आले आहे. विरोधकदेखील या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई व्हावी अशी मागणी करत आहेत. असे असतानाच आता पार्थ पवार यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. मी कोणताही घोटाळा केलेला नाही, असे पार्थ पवार यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. तसेच या प्रकरणावर अधिक बोलण्यास त्यांनी नकार दिला आहे.
दरम्यान, पार्थ पवार यांनी एका प्रकारे सर्व आरोप फेटाळले आहेत. पार्थ पवार यांच्यानंतर आता अजित पवारही या प्रकरणावर काय भूमिका मांडणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.