मालवणच्या राजकोट किल्ल्यावर राजकीय राडा, किल्ल्याचं नुकसान

नारायण राणे आणि ठाकरेंच्या समर्थकांमध्ये राडा झाला. शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे आणि आदित्य ठाकरेही राजकोट किल्ल्यावर आले. दोघांच्या समर्थकांकडून आधी घोषणाबाजी आणि नंतर राडा झाला. तर राणेंनी घरात खेचून एकएकाला मारुन टाकेन, अशी धमकीच दिली.

मालवणच्या राजकोट किल्ल्यावर राजकीय राडा, किल्ल्याचं नुकसान
| Updated on: Aug 28, 2024 | 9:03 PM

मालवणमध्ये जो राडा झाला, त्या दरम्यान खासदार नारायण राणेंचा संताप पोलिसांवरच उमटला. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना अंगावर येऊ द्या, एक एकाला मारुन टाकतो अशी धमकीच राणेंनी पोलिसांसमोर दिली. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राणे पिता पुत्र आणि आदित्य ठाकरेंसह महाविकास आघाडीचे नेते मालवणच्या राजकोट किल्ल्यावर आहे. एकाच वेळी आमनेसामने आल्यानं इथूनच राड्याची सुरुवात झाली.

पोलिसांनी राणे समर्थकांना रोखून आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना पाहणी करण्यास वाट मोकळी करुन दिली. पाहणी झाल्यानंतर आदित्य ठाकरेंना किल्ल्याच्या मागच्या बाजूनं बाहेर काढा. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशाद्वारातून जाऊ देणार नाही, अशी भूमिका निलेश राणेंनी घेतली आणि पुन्हा तणाव निर्माण झाला तर आदित्य ठाकरेंनीही 2 तास किल्ल्यातच ठिय्या मांडला.

इकडे राडा एवढा टोकाला पोहोचला की महाराजांच्या किल्ल्याच्या परिसरात ठाकरे आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. एकमेकांच्या दिशेनं लाकडंही भिरकावण्यात आली. तर निलेश राणेंनीही पोलिसांसोबत बाचाबाची करत अरेरावीची भाषा केली.

मध्यस्थी करण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांसह जयंत पाटीलही पुढे सरकारवले आणि काही वेळानंतर, अखेर पोलिसांनी नारायण राणे, निलेश राणेंसह कार्यकर्त्यांना रोखलं आणि मुख्य मार्गानंच आदित्य ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना किल्ल्याच्या बाहेर काढलं.

आदित्य ठाकरे किल्ल्याच्या बाहेर पडल्यानंतर, नारायण राणेही निघाले. त्यानंतर महाविकास आघाडीची मालवणच्या पिंपळ स्टॉप इथं भर पावसात सभा झाली.

मालवणच्या किल्ल्यावर ज्या पद्धतीनं राडा झाला. त्यावरुन उद्धव ठाकरेंनीही राणेंवर मोदी-शाहांचे दलाल अशी टीका केली. राजकोट किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला. त्यावरुन महाविकास आघाडीनं मालवणमध्ये मोर्चाची घोषणा केली होती. मात्र किल्ल्यावर पाहणीसाठी राणे आणि आदित्य ठाकरे एकाचवेळी समोरासमोर आले आणि अक्षरश: राडा झाला.

मालवणमधल्या या राजकीय राड्यात मात्र, शिवाजी महाराजांच्या किल्ल्याला धक्का पोहोचला. किल्ल्याच्या तटबंदीवरील दगड पडले. कार्यकर्त्यांच्या राड्यात किल्ल्याचंच नुकसान आपण करत आहोत, याचं भानही दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना राहिलं नाही. राडा शांत झाल्यानंतर निलेश राणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी तटबंदीचे दगड पुन्हा उचलून ठेवले. राग, शिवरायांच्या पुतळा कोसळण्याचा होता. पण त्याचवेळी राजकीय राड्यात महाराजांच्याच ऐतिहासिक वास्तूलाच धक्का लागला हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं.