ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? अखेर उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, त्या खासदारांना थेट.., राजकीय वर्तुळात खळबळ

राजकीय वर्तुळातू मोठी बातमी समोर येत आहे, शिवसेना ठाकरे गटाचे काही खासदार हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. आता या सर्व खासदारांना उद्धव ठाकरेंकडून तातडीचा संदेश पाठवण्यात आला आहे.

ठाकरे गटाचे खासदार वेगळा गट स्थापन करणार? अखेर उद्धव ठाकरेंनी डाव टाकला, त्या खासदारांना थेट.., राजकीय वर्तुळात खळबळ
उद्धव ठाकरे
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 15, 2026 | 10:14 PM

शिवसेना ठाकरे गटात फूट पडण्याची शक्यता आहे. काही खासदार हे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे. हे खासदार आता लवकरच नवा गट स्थापन करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच हा नवा गट लोकसभा अध्यक्षांना पत्र देखील देऊ शकतो असं देखील बोललं जात आहे. एकीकडे ही चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन बंगल्यावर देखील वेगवान घडामोडी घडत आहेत. आज माजी प्रधान सचिव अनंत कळसे यांनी नंदनवन बंगल्यावर जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. या भेटीदरम्यान ऑपरेशन टायगरच्या कायदेशीर बाबींसंदर्भात चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून देखील या सर्व पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे.

उद्धव ठाकरे यांनी रविवारी खासदारांची बैठक बोलावली होती, या बैठकीला पक्षाच्या एकूण 9 खासदारांपैकी केवळ 4 खासदारच उपस्थित होते. इतर पाच खासदार हे या बैठकीत व्हिसीच्या माध्यमातून सहभागी झाले होते, असा दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर आता उद्धव ठाकरेंकडून मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे. ओमराजे निंबाळकर, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश पाटील आष्टिकर, संजय देशमुख आणि संजय जाधव हे पाच खासदार बैठकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झाले नव्हते, या सर्व खासदारांना आता उद्धव ठाकरे यांनी एक संदेश पाठवला आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही तुमच्या वैयक्तिक कारणांमुळे या बैठकीला हजर नव्हता हे खरं आहे. परंतु तुम्ही बैठकीला हजर नसल्यामुळे जनतेमध्ये एक चुकीचा संदेश गेला आहे. प्रसारमाध्यमांमध्ये उलट सुलट चर्चा सुरू झाली आहे.

त्यामुळे तुम्ही आता जिथे कुठे असाल तिथून प्रसारमाध्यमांसाठी एक औपचारिक निवेदन जारी करा, ज्यामध्ये तुम्ही या बैठकीला का हजर राहू शकला नाहीत, त्याचं कारण स्पष्ट करा, तसेच तुम्ही कायम माझ्यासोबत आहात, शिवसेना ठाकरे गटासोबत आहात हे प्रसारमाध्यमांसमोर येऊ सांगा, त्यामुळे शिवसैनिकांच्या मनात असलेला संभ्रम दूर होईल. तसेच त्यानंतर पुढच्या दोन ते तीन दिवसांमध्ये तुम्ही मला वैयक्तिकरित्या भेटण्यासाठी या, आपण चर्चा करू असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us