प्रदीप पूर्णेकर हत्याकांड प्रकरण तापलं, पोलीस स्टेशनबाहेरच राऊतांचं थेट फडणवीसांना चॅलेंज, म्हणाले ठाण्यात येऊन…
ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता वातावरण चांगलंच तापलं आहे.

मोठी बातमी समोर येत आहे. ठाण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ठाण्यातील शिवसेना ठाकरे गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात गोळीबार करण्यात आला. या घटनेमध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी कापुरबाडी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन पोलीसांसोबत चर्चा केली. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये राऊत यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे.
नेमकं काय म्हणाले राऊत?
ही काही नेहमीची पत्रकार परिषद नाही, अत्यंत दुख:द वातावरणामध्ये आम्ही पत्रकारांसोबत बोलत आहोत. बाहेर एक रुग्णवाहिका आहे, आणि त्या रुग्णवाहिकेमध्ये एका निष्ठावान शिवसैनिकाचा मृतदेह आहे. त्यांच्यावर काल साधारण याचवेळेला गोळीचे साधारणपणे सात राउंड फायर करण्यात आले. भर रस्त्यावर असलेल्या कार्यालयामध्ये हा प्रकार घडला. ही हत्या दडपण्याचा प्रयत्न कालपासून इकडे सुरू आहे. एफआयआरमध्ये साधं आरोपीचं नाव देखील नाहीये. या ठाण्याला एखाद्या स्वतंत्र राज्याच्या, देशाचा दर्जा दिलाय का? इकडचा कायदा वेगळा आहे का? असा थेट सवालच यावेळी संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.
पूर्णेकरांची हत्या करणारे जे संशयित आरोपी आहेत, ज्यांनी हे कारस्थान रचलं त्या कारस्थानाचे जे सूत्रधार आहेत. त्यांना पोलीस संरक्षण देणार आहे. या राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमच्या सर्वांचं आव्हान आहे. तुम्ही राज्यात कायदा सुवस्थेच्या गप्पा मारत आहात ना? जरा दोन दिवस राज्यात वेश पालटून फिरा. मग तुम्हाला या ठाण्यात कायदा सुव्यवस्थेची स्थिती किती भंयकर झाली आहे ते कळेल. एका महिन्याच पाच खून झाले आहेत, त्याच्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे.
आम्ही इथे आज आलो कारण ज्यांच्यावर पूर्णेकरांच्या हत्येचा संशय आहे, त्यांचं नावच एफआयआरमध्ये नव्हतं. त्यासाठी वांरवार इथे पूर्णेकर कुटुंब धरणं धरतंय. बाहेर मृतदेह आहे, एफआयआरमध्ये मुख्य संशयित आरोपीचं नाव नाही, म्हणजे तुम्ही कोणाला वाचवत आहात? असंही यावेळी संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आता इथे मी आणि आदित्य ठाकरे आलो, पोलिसांसोबत चर्चा केली, आम्ही इथून जाणार नाही, असं म्हटलं तेव्हा पुरवणी एफआयआर दाखल करण्यात आली. ज्यामध्ये दोन्ही मुख्य संशयित आरोपींची नाव सामील करण्यात आली आहेत, असंही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.
