प्रसाद लाड यांना धमकी दिलीच नाही, त्या तरुणाचा मोठा दावा, थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

प्रसाद लाड हे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्यामुळे ते गुरुवारी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. याच दरम्यान त्यांना धमकीचे दोन ते तीन कॉल आल्याचा दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये घुसून मारू अशी त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

प्रसाद लाड यांना धमकी दिलीच नाही, त्या तरुणाचा मोठा दावा, थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
Ganesh Ugle
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 22, 2026 | 9:51 PM

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा आपल्या विविध मागण्यांसाठी येत्या 30 मे पासून आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत. या पार्श्वभूमीवर आज भाजप नेते प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यावेळी प्रसाद लाड आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामध्ये महत्त्वाची चर्चा झाली. दरम्यान प्रसाद लाड हे आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार असल्यामुळे ते गुरुवारी रात्रीपासूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये मुक्कामी होते. याच दरम्यान त्यांना धमकीचे दोन ते तीन कॉल आल्याचा दावा करण्यात येत आहे. हॉटेलमध्ये घुसून मारू अशी त्यांना धमकी दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

दरम्यान हे प्रकरण समोर येताच पोलिसांनी या प्रकरणात दोन तरुणांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडून देण्यात आलं. योगेश शेळके पाटील व गणेश उगले अशी या तरुणांची नावं आहेत. आंदोलन सुरू असताना तुम्ही मनोज जरांगे पाटील यांच्यावर टीका करत होतात, आणि आता त्यांची भेट घेतायेत, आम्ही तुमच्यावर हल्ला करू अशी धमकी या तरुणांनी दिल्याचा आरोप होत आहे. दरम्यान दुसरीकडे मात्र या तरुणांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. प्रसाद लाड यांच्या पीएसोबत जे बोलणं झालं त्याची ऑडिओ क्लिप देखील गणेश उगले यांनी ऐकवली आहे, परंतु या ऑडिओ क्लिपची पुष्टी टीव्ही 9 मराठी करत नाही.

गणेश उगले यांनी नेमकं काय म्हटलं?

प्रसाद लाड यांना धमकी दिल्याचा प्रकरणात पोलिसांनी गणेश उगले आणि योगेश शेळके यांना अटक केली होती, त्यानंतर त्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलं. दरम्यान या दोन्ही तरुणांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आम्ही प्रसाद लाड यांच्या पीएला फोन केला मात्र हल्ल्याची धमकी दिली नाही, असा दावा गणेश उगले यांनी केला आहे, तर मी फक्त प्रसाद लाड यांना निवेदन देण्यासाठी गेलो होतो, तर मला सुद्धा पोलिसांनी मारहाण केली असं या आरोपांवर स्पष्टीकरण देताना योगेश शेळके यांनी म्हटलं आहे. दरम्यान पुन्हा एकदा गणेश उगले यांच्याकडून प्रसाद लाड यांना इशारा देण्यात आला आहे, प्रसाद लाड यांनी मराठा समाजाची माफी मागावी अन्यथा त्यांना आम्ही काळे झेडे दाखवणार, असा इशारा गणेश उगले यांनी दिला आहे. दरम्यान त्यांनी यावेळी प्रसाद लाड यांच्या पीएसोबत जे बोलणं झालं त्याची कथित ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे. या कथित ऑडिओ क्लिपनुसार जेव्हा गणेश उगले यांनी फोन केला तेव्हा तो फोन प्रसाद लाड यांच्या पीएने उचलला.

ऑडिओ क्लिपमधील संभाषण जसच्या तसं

गणेश उगले – हॅलो हॅलो, नमस्कार गणेश उगले पाटील बोलतोय छत्रपती संभाजीनगर वरून

लाड यांचे पीए – नमस्कार बोला, बोला साहेब

गणेश उगले- लाड साहेब आहेत का?

पीए – मी साहेबांसोबत नाही, आपण कोण बोलता ते सांगा

गणेश उगले – गणेश उगले पाटील बोलतोय छत्रपती संभाजीनगर धर्मवीर छावा संघटनेचा संस्थापक अध्यक्ष

पीए -बोला साहेब

उगले – लाड साहेब मराठवाड्यात येणार आहेत असं ऐकलं

पीए – हो साहेब आलेत ऑलरेडी

उगले – कुठे थांबले आहेत

पीए – ते लोकेशन मी देऊ शकत नाही, मात्र ते उद्या जरांगे पाटील यांना भेटणार आहेत साडेदहा वाजेपर्यंत

उगले – अच्छा आम्हाला शिव्या देऊन आमच्याकडेच आले परत ठीक आहे

पीए – काय -काय

उगले – साहेब आहेत का तुमच्यासोबत?

पीए – तुम्हाला शिव्या देऊन म्हणजे?

उगले- मराठा समाजाला शिव्या दिल्या नाही का त्यांनी?

पीए – मराठा समाजाला त्यांनी शिव्या दिल्या नाहीत, साहेब मराठा समाजासाठीच तिकडे आले आहेत.

 

Follow Us