पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली; विमान उड्डाण घेण्याच्या तयारीत, अचानक…; 120 प्रवासी घामाघूम
pune airport : पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना घटना टळली आहे. या घटनेतून जवळपास 120 प्रवाशांचे जीव वाचवण्यात यश आलं आहे.

पुणे विमानतळावर मोठी दुर्घटना टळली आहे. 120 प्रवाशांनी भरलेलं विमान हे उड्डाण घेण्याच्या तयारीत होते. मात्र, त्याचवेळी धावपट्टीवर कुत्रा आला. त्यामुळे पायलटला अचानक उड्डाण रद्द करावे लागले. पुणे-जयपूर एअर इंडिया इंडिया एक्स्प्रेसचे विमान उड्डाणाच्या तयारीत असताना हा संपूर्ण प्रकार घडला. पायलटने अखेरच्या क्षणी ब्रेक मारलाय. यामुळे विमानातील प्रवासी घाबरले, त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्याहून जयपूरला जाणारे विमान हे शुक्रवारी दुपारी अपघातातून थोडक्यात बचावले. टेकऑफ घेण्यासाठी विमान धावपट्टीवर सज्ज झालं. विमानाने वेग गाठला. मात्र, तितक्यात एअर ट्रॅफिक कंट्रोलला धावपट्टीवर भटका कुत्रा दिसला. एटीसीने आपत्कालीन सूचना दिल्यानंतर पायलटने शेवटच्या क्षणी ब्रेक दाबला. पायलटने अचानक ब्रेक दाबल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला. परंतु कोणताही अनर्थ घडला नसल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
ही संपूर्ण घटना शुक्रवारी दुपारी 3.15 वाजता घडली. विमान जयपूरला निघालं होतं. पुण्याहून जयपूरला निघालेलं विमान धावपट्टीवर कुत्रा दिसल्याने थांबवण्यात आलं. त्यानंतर विमानाची तांत्रिक तपासणी करण्यात आली. त्यानंतर 100 मिनिटांनी पुन्हा विमानाने उड्डाण केले. परवानगीनंतरच विमानाने दुपारी 4:55 वाजता विमानाने उड्डाण केले.
विमानतळ परिसरात भटक्या कुत्र्यांचा वावर
भुवनेश्वरहून येणाऱ्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या विमानाला धावपट्टीवर 28 जून रोजी एक कुत्रा दिसला होता. त्यामुळे विमानाला ‘गो-अराउंड’ करावे लागले होते. त्यानंतर अभियंत्यांनी विमानाला उड्डाणासाठी परवानगी दिली होती. या प्रकारानंतर विमानतळावर भटक्या कुत्र्यांचा वावर वाढल्याचे बोलले जात आहे.
प्रवाशांच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह
विमानतळावरील घटनेमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं.या आपत्कालीन ब्रेकमुळे विमानातील प्रवाशांमध्ये काही काळ भीती आणि संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेने आता विमानतळावरील भटक्या कुत्र्यांचा वावर आणि सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.