
देशातील भ्रष्टाचार कमी झाल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. मात्र आता पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कोट्यवधींची लाच मागताना 2 जणांना रंगेहात पकडले आहे. 5 डिसेंबर रोजी सापळा लावून विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी 2 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने पुण्यातील विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत एक दोन हजार नव्हे किंवा लाख नव्हे तर तब्बल 8 कोटींची लाच मागणाऱ्या दोन व्यक्तींना रंगहात पकडले आहे. त्यांच्यावर आता विश्रामबाग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद देशमुख आणि भास्कर पौळ अशी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या घटनेते पुण्यात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार व्यक्तीची 32 गुंठे सोसायटी जमीन पुण्यात कॅन्टोन्मेंट क्षेत्रात आहे. 2005 नंतर या जमिनीचा नवा 7/12 उतारा, नवीन नकाशा यासाठी तक्रारदार वारंवार सरकारी कार्यालयात पाठपुरावा करत होते. 2020 पासून तक्रारदारांचे काम काही केल्या होत नव्हते. सरकारी अभिलेख विभागातील काही अधिकारी व मध्यस्थांमार्फत ‘लाच देणे गरजेचे आहे’ अशी मागणी सुरू असल्याची तक्रारदारांना कल्पना दिली गेली.
यानंतर दोन आरोपींनी तक्रारदारांशी संपर्क साधून 8 कोटी रुपये दिले तरच जमीन नोंदणी व इतर कागदपत्रे मिळतील असे सांगितले. आरोपींनी तक्रारदारांच्या घरच्या सदस्यांकडेही संपर्क केला, त्यांना मानसिक त्रास दिला आणि पैशांची मागणी केली. यामुळे कंटाळून तक्रारदारांनी 5 डिसेंबर 2025 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. यानंतर पोलीसांनी सापळा लावून आरोपींना रंगेहाथ पकडले आहे.
8 कोटींची लाच मागणाऱ्या आरोपींमध्ये विनोद देशमुख (शासकीय भूमी अभिलेख खात्यातील सरकारी कामकाजाशी संबंधित व्यक्ती, कार्यालय :पुणे, न्यू भामा सोसायटी, वाढगाव बुद्रुक) आणि भास्कर पौळ (स्वतःला ‘सरकारी भूसंपादन सल्लागार व ऑडीटर’ म्हणवणारा. पत्ता : रामपूर रोड, मंगुठा मंदिराजवळ, रहिमाबाद, नवी मुंबई या दोघांचा समावेश आहे. या दोघांनी पहिल्या हप्त्यात 30 लाखांची मागणी केली होती. हेच 30 लाख रुपये घेताना या आरोपींना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. आता पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील कारवाई सुरु केली आहे.