नाशिकनंतर पुणेही हादरलं! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढाच्या पापाचा घडा फुटला; आणखी एक गुन्हा दाखल

मुंबईतील हनी ट्रॅप प्रकरणात अटक झालेल्या प्रफुल लोढाविरुद्ध पुण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. एक ३६ वर्षीय महिलेने लोढाच्या विरोधात बावधन पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून, लोढाने नोकरीच्या आमिषाने तिच्याशी बलात्कार केला असा आरोप आहे.

नाशिकनंतर पुणेही हादरलं! गिरीश महाजनांचे विश्वासू प्रफुल लोढाच्या पापाचा घडा फुटला; आणखी एक गुन्हा दाखल
praful lodha
| Updated on: Jul 22, 2025 | 8:53 AM

सध्या महाराष्ट्रात हनी ट्रॅप प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल लोढा नावाच्या व्यक्तीवर दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली होती. प्रफुल लोढा यांच्यावर हनी ट्रॅप आणि अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी मुंबईत गुन्हा दाखल झाला आहे. त्यातच आता प्रफुल लोढा यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. त्यांच्याविरोधात आता पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील बावधन पोलिस ठाण्यात आणखी एक बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

नेमकं प्रकरण काय? 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात प्रफुल लोढा याच्याविरोधात बलात्काराचा आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा १७ जुलै २०२५ रोजी दाखल करण्यात आला. मात्र याबद्दल पिंपरी-चिंचवड पोलिसांनी कमालीची गुप्तता पाळल्याने त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

पुण्यातील कोथरूड येथे राहणाऱ्या एका ३६ वर्षीय महिलेने प्रफुल लोढाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार, प्रफुल लोढाने माझ्या पतीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवले होते. याच बहाण्याने २७ मे २०२५ रोजी रात्री आठ वाजता त्याने मला बालेवाडीतील एका हॉटेलमध्ये बोलावले. त्या हॉटेलमध्ये लोढाने मला तुझ्या पतीला नोकरी लावायची असेल तर त्या बदल्यात मला तुझ्याशी शरीरसंबंध ठेवू दे, अशी मागणी केली. मी याला विरोध केला. त्यावेळी लोढाने मला तुझीही नोकरी घालवेन अशी धमकी दिली. यानंतर माझ्या इच्छेविरुद्ध लोढाने जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, असे तिने तक्रारीत नमूद केले आहे.

प्रफुल लोढा सध्या अटकेत

आता याप्रकरणी पीडित महिलेने १७ जुलै रोजी बावधन पोलिस ठाण्यात धाव घेऊन प्रफुल लोढाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लोढावर बलात्कार (कलम ३७६) आणि धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. प्रफुल लोढा सध्या मुंबई पोलिसांच्या अटकेत आहे. मुंबई पोलिसांनी त्याला ‘हनी ट्रॅप’ आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी अटक केली आहे. आता पिंपरी-चिंचवड पोलिस लवकरच मुंबई पोलिसांकडून लोढाचा ताबा घेण्याची शक्यता आहे. जेणेकरून बावधन येथील प्रकरणात त्याची अधिक चौकशी करता येईल.

प्रफुल लोढावर एकापाठोपाठ एक गंभीर गुन्हे दाखल होत त्याच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. तसेच, बावधन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होऊनही पोलिसांनी इतके दिवस हे प्रकरण गोपनीय का ठेवले, याबाबतही आता चर्चा सुरू झाली आहे. या गुप्ततेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त केला जात आहे.