मुरलीधर मोहोळ यांनी 50 कोटींचा तो व्यवहार रद्द करावा, राजू शेट्टींची मागणी

पुण्यात जैन बोर्डिंगच्या जागेच्या बेकायदेशीर विक्रीवरून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ वादाच्या भोवऱ्यात आहेत. त्यांनी गोखले कंपनीशी संबंध नाकारले असले तरी, राजू शेट्टींनी ५० कोटींच्या कर्जाची चौकशी, मोहोळ यांच्या भेटींचे पुरावे आणि व्यवहारातील अनियमिततांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी 50 कोटींचा तो व्यवहार रद्द करावा, राजू शेट्टींची मागणी
| Updated on: Oct 19, 2025 | 12:36 PM

पुण्यात जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचा मुद्दा सध्या चर्चेत आहे. या प्रकरणावरुन केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर गंभीर आरोप होत आहे. आता यावर माझा गोखले कंपनीशी संबंध नाही. कंपनीतून मी २०२४ मध्येच बाहेर पडलो आहे. राजू शेट्टी यांना कुणीतरी चुकीची माहिती दिली आहे, ते नुराकुस्ती खेळतात, तर रविंद्र धंगेकर हे बिळातील उंदीर आहेत, अशा शब्दात मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिले. आता राजू शेट्टी यांनी याप्रकरणी गंभीर आरोप केले आहेत. गोखले बिल्डर्सला ५० कोटींचं कर्ज अर्ज केल्यानंतर लगेचच कसं दिलं, हे कसं काय शक्य आहे. मोहोळ यांनी हा व्यवहार रद्द करायला हवा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

राजू शेट्टी यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. मुरलीधर मोहोळ यांनी राजीनामा दिला होता ही गोष्ट खरी असली तरी जैन बोर्डींगचा परिसर बघण्यासाठी मोहोळ यांनी मंदिराला भेट दिली होती की नाही हे सांगावं. त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहे. त्यांनी भेट दिली होती ट्रस्टींसोबत त्यांची मीटिंग झाली होती. हे सर्व कोणत्या उद्देषाने झाले हे त्यांनी स्पष्ट करावं. त्यांच्या मनात जर पाप नसेल तर आमचं काहीही म्हणणं नाही, असे राजू शेट्टी म्हणाले.

याला योगायोग म्हणायचा का?

एवढ्या तातडीने एक अर्ज केल्यानंतर कर्नाटकातल्या सीकोडीतील अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे ५० कोटींचं लगेच कसं मंजूर होतं. त्यात मुरलीधर मोहोळ यांचा मंत्री म्हणून सहभाग असल्याशिवाय एवढ्या लगेचच कर्ज मंजूर कसं होतं. सीकोडीतील क्रेडिट सोसायटीचे चेअरमन अण्णासाहेब हे भाजपचे माजी खासदार आहेत याला योगायोग म्हणायचा का, या व्यवहाराला बेकायदेशीररित्या मान्यता देणारे कलोते नावाचे धर्मादाय आयुक्त आहे, ते मुख्यमंत्र्‍यांचे जवळचे नातेवाईक आहेत. त्यालाही योगायोग म्हणायचा का, एवढे सर्व योगायोग एकाच प्रकरणात कसे येऊ शकतात, याचेही उत्तर मिळायला हवं, असेही राजू शेट्टींनी म्हटले.

हा व्यवहार रद्द करायला हवा

माझ्याकडे याबद्दलचे फोटो आहेत. त्यांनी जैन बोर्डींगला भेट दिली होती. गोखले बिल्डर्सला ५० कोटींचं कर्ज कसं दिला, अर्ज केल्यानंतर लगेचच कर्ज दिलं. हे कसं काय शक्य आहे. मोहोळ यांना हे आरोप नाकारता येणार नाही. त्यांनी हा व्यवहार रद्द करायला हवा. आम्ही ३ हजार कोटींचा शोध लावलेला नाही. या प्रकल्पातून ३ हजार कोटींचा नफा मिळणार आहे, असे त्यांनी सांगितले. जर तुम्ही २३० कोटींची प्रॉपर्टी खरेदी करुन त्यातून जर ३ हजार कोटी कमावत असतील तर हे बोलणं गरजेचे आहे. जर एक फ्लॅट ६ कोटीला विकणार असतील तर असे किती फ्लॅट असतील, याचा हिशोब गोखले बिल्डर्सने करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली.