
Jain Boarding Scam : पुण्यातील जैन बोर्डिंग जमिनीचे कथित गैरव्यवहार प्रकरण चांगलेच तापले आहे. पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर याप्रकरणी गंभीर आरोप होत आहेत. मोहोळ यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचा आरोप होत आहे. मात्र मोहोळ यांनी जैनमुनींची भेट घेत, माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल असं विधान केलं होतं. यानंतर आता जैनमुनींनी याबाबत आक्रमक भूमिका घेतला आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
जैनमुनींनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी सर्वात मोठा निर्णय घेताना म्हटले की, ‘मंत्री आणि खासदार मोहोळ यांनी या ठिकाणी भेट देत मी तुमची समस्या सोडवेन असं म्हटलं आहे, मात्र समाजाला त्यांच्यावर विश्वास नाही. त्यामुळे उद्या (27) संपूर्ण देशात मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आम्ही गावाखेड्यात मोर्चा काढू आणि अधिकाऱ्यांनी निवेदन देऊ.’
रवींद्र धंगेकर यांच्याबाबत बोलताना जैनमुनी म्हणाले की, राष्ट्रीय माध्यमात मांजर नाचलं तरी व्हिडियो येतो, मात्र महावीर स्वामींचं मंदिर विकलं गेलं तरी राष्ट्रीय माध्यमं गप्प आहेत. राज्यातील चॅनल चांगलं काम करत आहेत. धंगेकर आंदोलनासाठी उत्साहित आहेत. त्यांचा आपला जोश चांगला आहे. एक तारीख च्या आधी डील नाही रद्द झाली नाही एकत्र आंदोलन करू. त्यांनी वेगळं आंदोलन करू नये.
जैनमुनींची भेट घेतल्यानंतर बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले होते की, ‘मी या प्रकरणात सहभागी आहे, किंवा माझे कोणीतरी सहभागी आहे असे आरोप केले जात आहेत. परंतु माझा यामध्ये सहभाग नाही, हे मी वारंवार पुराव्यानिशी स्पष्ट केले आहे. प्रत्येक समाजाचे गुरू असतात ते सर्वांसाठी वंदनीय असतात. त्यांचे दर्शन घेण्यासाठी मी येथे आलो आहे. मी जर दोषी असतो तर मी इथे आलोच नसतो. या सर्व विषयावर राजकारण झाले आहे, व्यक्तीगत राजकारणातून या गोष्टी घडत गेल्या, मी आपल्याला आश्वासित करतो की या प्रकरणात योग्य न्याय होईल. मी तुम्हाला न्याय मिळवून देईल, काही दिवसांत हा प्रश्न संपेल आपल्या हवा तसा हा विषय संपेल. प्रेमाला प्रेमाची साध दिली जाते, लोकप्रतिनिधी आणि खासदार म्हणून मला तुम्ही निवडून दिलं आहे. हा विषय संपवण्यासाठी तशी भूमिका घेण्यासाठी मी इथे आलो आहे.