बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, गावकरी आक्रमक; आज पुन्हा आंदोलन

पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात लहान मुलाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाचे वाहन व कार्यालय पेटवून दिले, तसेच रास्ता रोको आंदोलन केले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालण्याची मागणी केली असून, या भागातील बिबट्याची दहशत व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, गावकरी आक्रमक; आज पुन्हा आंदोलन
बिबट्याच्या हल्ल्यात मुलाचा मृत्यू, गावकरी संतप्त
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Nov 03, 2025 | 9:21 AM

राज्यातील विविध भागांत बिबट्याची दहशत कायम असून बिबट्याच्या हल्ल्यात जीव गमावावा लागल्याच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत. पुण्यातील शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याचे हल्ले सुरूच असून त्यामध्ये एका मुलाला जीव गमवावा लागला. पिंपरखेड येथे काल रोहन विलास बोंबे या 10 वर्षांच्या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. यामुळे गावावर शोककळा पसरली असून मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीय आणि गावकरी संतप्त झाले. यानंतर सुरू झालेलं आंदोलन 7 तासांनी स्थगित करण्यात आलं. आज पुन्हा पुणे-नाशिक महामार्गावर मंचर येथे आंदोलन होणार आहे.

या हल्ल्यात मुलाचा मृत्यू झाल्यानंतर काल स्थानिक नागरिकांनी, ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या चिमुकल्यावर अंत्यसंस्कार करणार नाही, पहिले बिबट्याचा बंदोबस्त करा नंतरच अंत्यविधी करू अशी भूमिका घेतली होती त्यामुळे वातावरण तापले होते. एवढंच नव्हे तर या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले.

गावकऱ्यांनी गाडीच पेटवली

बिबट्याच्या हल्ल्यात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाची गाडी जाळीत वनविभागाचं कार्यालय पेटवून देत संतप्त ग्रामस्थांकडून बेल्हे जेजुरी महामार्गावरील पंचतळे आणि अष्टविनायक महामार्गावरील रोडेवाडी फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. तीन तासापासून महामार्ग रोखल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. बिबट्याचा वेळीच बंदोबस्त करा अशी मागणी करत नागरिक आक्रमक झाले होते.

मंचरमध्ये आज पुन्हा होणार रास्ता रोको

दरम्यान याच घटनेच्या पार्श्वभूमीवर मंचरमध्ये आज पुन्हा पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन होणार आहे. आमदार शरद सोनावणेदेखील उपस्थित राहतील. यावेळी या भागातील सर्व गावंही बंद राहणार आहेत.

जांबूत, पिंपरखेड परिसरातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घाला –  अमोल कोल्हे यांची मागणी

जांबूत, पिंपरखेड परिसरातील नागरिकांच्या जिविताचे रक्षण करण्यासाठी या भागातील नरभक्षक बिबट्यांना गोळ्या घालून ठार मारण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्राद्वारे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्याकडे केली.

पिंपरखेड येथे आज रोहन विलास बोंबे या चिमुकल्याचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी वनविभागाचे वाहन आणि कार्यालय पेटविले. या घटनेची तत्काळ गंभीर दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी पुणे प्रादेशिक विभागाचे मुख्य वनसंरक्षक आशिष ठाकरे यांना पत्र पाठवून नरभक्षक बिबट्यांना ठार मारण्यासाठी एलिमिनेशन ऑर्डर काढण्यासाठी चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन, राज्य सरकार तसेच संबंधित यंत्रणेची परवानगी घेण्यासाठी त्वरीत पावले उचलावीत अशी मागणी केली.

पिंपरखेड येथे अवघ्या 10 दिवसांत 2 लहानग्या निष्पाप जीवांचा बळी गेला, तर महिनाभरात ही तिसरी घटना घडली. असे असूनही राज्य सरकार उपाययोजना करण्यासाठी पावले उचलण्याकडे दुर्लक्ष करीत आहे, ही अतिशय चीड आणणारी बाब असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी म्हटले. भरदिवसा माता-भगिनी आणि लेकरांचा बळी जात असताना सरकार निष्ठूरपणे बघत आहे. त्यामुळेच आज नागरिकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. राज्य सरकारला माझी कळकळीची विनंती आहे की, यापुढे एकही क्षण न दवडता आमच्या जिवाभावाच्या माणसांचे जीव वाचवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावेत अशी मागणी खासदार डॉ. कोल्हे यांनी केली आहे.