Nasrapur Case : पीडित चिमुरडीच्या शरीरावर…; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आणखी एक धक्कादायक माहिती उघड

पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेल्या अत्याचार आणि हत्या प्रकरणाचा धक्कादायक शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. आरोपीने केलेल्या क्रूरतेचा आणि मृत्यूच्या कारणाचा खुलासा पोलिसांनी न्यायालयात केला असून तपासाची सविस्तर माहिती वाचा.

Nasrapur Case : पीडित चिमुरडीच्या शरीरावर...; पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आणखी एक धक्कादायक माहिती उघड
Bhor Nasrapur case
| Updated on: May 08, 2026 | 7:49 AM

पुण्यातील नसरापूर येथील चिमुरडीवर झालेला अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या तपासात आता एक मोठी आणि धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल समोर आला आहे. यानुसार आरोपीने पीडित बालिकेच्या शरीरावर टणक हत्याराने वार केल्याने गंभीर जखमा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती न्यायालयात सादर केली.

क्रूरतेचा कळस

१ मे रोजी नसरापूर येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा प्राथमिक तपास आणि वैद्यकीय अहवाल आता समोर आला आहे. या शवविच्छेदन अहवालानुसार, बालिकेच्या शरीरावर अनेक ठिकाणी दुखापतींच्या खुणा असल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांनी न्यायालयात दिलेल्या माहितीनुसार, या जखमा एखाद्या बोथट किंवा टणक वस्तूने/हत्याराने वार केल्यामुळे झाल्या आहेत. आरोपीने गुन्ह्यासाठी नेमके कोणते हत्यार वापरले, याचा शोध घेण्यासाठी पोलीस आता आरोपीची अधिक सखोल चौकशी करणार आहे.

श्वास कोंडून मृत्यू

तसेच या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे मुख्य कारणही स्पष्ट करण्यात आले आहे. अत्याचार करताना आरोपीने चिमुरडीच्या घशात जबरदस्तीने मोजा कोंबल्यामुळे तिचा श्वास रोखला गेला. श्वास घेता न आल्याने गुदमरून तिचा मृत्यू झाला. तसेच तिच्या नाकातून रक्तस्त्राव देखील झाला, असाही उल्लेख वैद्यकीय अहवालात करण्यात आला आहे.

याप्रकरणी आरोपीची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी त्याला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष सरकारी वकील अ‍ॅड. अरुंधती ब्रह्मे यांनी याबद्दल न्यायालयात जबरदस्त युक्तीवाद केला. यावेळी पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेले टणक हत्यार हस्तगत करणे, सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या संशयास्पद गाठोड्याचा शोध घेणे आणि गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचा तपास करणे अद्याप बाकी आहे. या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायाधीश एम. जी. चव्हाण यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीत १२ मेपर्यंत वाढ करण्याचे आदेश दिले आहेत.

तसेच सुरक्षेच्या कारणास्तव आणि समाजात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाची सुनावणी प्रत्यक्ष हजेरीऐवजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्याची विनंती न्यायालयाने मान्य केली आहे.

नेमकी घटना काय?

भोर तालुक्यातील नरसापूर परिसरात एका ६५ वर्षीय नराधमाने ओळखीचा फायदा घेत एका ४ वर्षांच्या निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार केला. यानंतर त्या नराधमाने त्या निष्पाप मुलीची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी वेगाने हालचाली करत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. हा नराधम कुटुंबाच्या ओळखीचाच असल्याने परिसरातून अधिक संताप व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. विरोधकांनी गृहविभागावर जोरदार टीका करत आरोपीला तातडीने फाशी देण्याची मागणी केली आहे. पीडित पित्याच्या या आवाहनामुळे राजकीय वर्तुळात शांतता पसरली असून, त्यांच्या शब्दांनी समाजातील संवेदनशील घटकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीवर पोक्सो (POCSO) आणि खुनाचे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी यासाठी जलदगती न्यायालयात खटला चालवण्याची मागणी जोर धरत आहे.

Follow Us