
पुण्यातील सिंहगड किल्ल्याच्या कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालण्यासाठी गेलेला डॉक्टर 350 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना. या घटनेची माहिती मिळतात हवेली पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकासह तात्काळ घटनास्थळी दाखल होत, रात्रीच्या अंधारात दरीत शोधकार्य करत रेस्क्यू ऑपरेशन राबवलं. डॉ. प्रशांत नंदवते असं दरीत कोसळलेल्या तरुणाचे नाव आहे. संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास नंदवते हे पाय घसरून दरीत पडले होते. त्यानंतर तब्बल पाच तासांनंतर त्यांना दरीतून बाहेर काढण्यात यश आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल सायंकाळी 4 च्या सुमारास डॉ . प्रशांत नंदवते वय (40) राहणार मधुबन सोसायटी, कोल्हेवाडी हे खेडशिवापूर येथील खाजगी रुग्णालयात रुग्ण पाहण्यासाठी निघाले होते. मात्र यावेळी त्यांना फोन आला की, रुग्ण हा तांबाड तालुका भोर येथून येणार आहे. त्याला यायला थोडा वेळ लागणार आहे. यामुळे डॉ. नंदवते हे सिंहगड किल्ल्याच्या कात्रज ते सिंहगड या पायी मार्गावर चालण्यासाठी गेले. यावेळी चालत असताना बूट घसरल्याने ते 350 फूट खोल दरीत कोसळले. चिलीमचा खड्डा या पॉईंटजवळ ही घटना घडली.
दरीत कोसळल्यानंतर प्रशांत नंदवते यांनी सावध होऊन 112 वर कॉल केला. घटनेची माहिती मिळताच हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार समाधान चोरमले आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. हवेली पोलिसांनी आपत्ती व्यवस्थापन पथकाशी संपर्क साधला. त्यानंतर हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाचे तानाजी भोसले , गणेश सपकाळ, वैभव भोसले , संतोष जाधव यांच्यासह वनसंरक्षक समितीचे कैलास जरांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने घटनास्थळी पोहचताच त्यांनी बचावकार्य चालू केले. आपत्ती व्यवस्थापनचे तानाजी भोसले हे दरीत गेले आणि इतर सहकारी वरच्या बाजूला थांबले. दोराच्या साहाय्याने त्यांनी डॉ. प्रशांत नंदवते यांना खोल दरीतून बाहेर काढले. ही बचाव मोहीम राबवत असताना रात्र झाली होती. अंधारामुळे अनेक अडथळे येत होते. मात्र बॅटरीच्या साह्याने डोंगराचे अवघड चढ उतार पार करत, अवघड परिस्थितीत नंदवते यांचा शोध घेत त्यांनी वाचवण्यात पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या पथकाला यश आले. सध्या डॉ प्रशांत नंदवते यांची प्रकृती स्थिर असून, शरीराला थोडे खरचटले आहे. नंदवते यांना सुखरूप वाचवल्यानंतर हवेली पोलिस आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाच नागरिकांकडून कौतुक होत आहे.