
पुणे जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. दौंड तालुक्यातील यवतमध्ये दोन गटात तणाव निर्माण झाला आहे. व्हॉट्सअॅप ग्रृपमध्ये आक्षेपार्ह पोस्ट केल्याने तणाव निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. या तणावामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटा तैणात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडत परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
यवतमध्ये सकाळपासून तणावाचे वातावरण आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांच्या घरांवर दगडफेक केली जात आहे. एका तरुणाने व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याने हा तणाव निर्माण झाला आहे. काल या ठिकाणी एक मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार गोपीचंद पडळकर आणि संग्राम जगताप हे उपस्थित होते. मात्र हा तणाव अद्यापही कायम आहे. काही ठिकाणी जाळपोळ झाल्याचीही माहिती समोर आली आहे. त्यामुळे पुणे पोलिसांची विशेष तुकडी या ठिकाणी दाखल झाली आहे.
दौंडचे आमदार राहुल कूल यांनी याबाबत बोलताना सांगितले की, यवतमध्ये गेले दोन तीन दिवस तणावपूर्ण वातावरण होतं. सर्वांशी संपर्क करुन तणाव निवळण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु होते. आता तिथे जमाव जमला आहे, त्यामुळे पोलिसांचा मोठा फौजफाटाही तैणात करण्यात आला आहे. आन्ही परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत.
या घटनेबाबत बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं की, हे दुर्दैवी आहे. ज्या भागांमध्ये कधी जातीय तणाव झाले नाहीत तिथे तणाव निर्माण झाला आहे. राजकीय हितासाठी महाराष्ट्राच स्वास्थ खराब करण्याचं काम सुरु आहे. हे निंदणीय आहे. तणाव शांत करण्याचे काम पुढाऱ्यांचे असते मात्र सध्याचे पुढारी जातीय तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतात.
यवतमधील ग्रामस्थांनी सांगितले की, एका तरुणाच्या पोस्टमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र आता स्थानिक नेत्यांनी समजूत काढल्यानंतर अनेकजण आपापल्या घरी गेले आहेत. यापुढे शांतता राहील अशी अपेक्षा आहे. बाहेरून आलेल्या लोकांमुळे हे घडलं आहे. मतांच्या लालसेपोटी त्यांनी पाठीशी घालू नये असं एका ग्रामस्थाने म्हटलं आहे.