
Pune Suicide Case : मृत्यू कधी येईल आणि त्याचे कारण काय असेल हे सांगता येत नाही. काही मृत्यू तर इतके गूढ असतात की त्याचं कारण समजणं फारच कठीण होऊन बसतं. सध्या पुण्यात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका तलाठी आणि मुलीचा मृतदेह खोल दरीत आडला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. असं असलं तरी दोघांच्याही मृत्यूचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कोकण कड्याहून साधारण 1200 फूट खोल दरीत हे दोन्ही मृतदेह आढळले आहेत. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार पुण्यात एक तलाठी आणि एका मुलीचा मृतदेह दरीत आढळला आहे. या दोघांनीही आत्महत्या केल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. पुण्याच्या जुन्नरमध्ये हे दोन्ही मृतदेह आढलले आहेत. आंबे-हातवीज येथील कोकण कड्यावरून उडी मारून या दोघांनी स्वत:चं आयुष्य संपवलं असा प्राथमिक अंदाज बांधला जातोय.
त्यांच्या कथित आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृत पुरुष हा अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा इथं तलाठी म्हणून कार्यरत होता. रामचंद्र साहेबराव पारधी (वय 40) असं या मृत तलाठ्याचं नाव आहे. तर या तलाठ्यासोबत ज्या मुलीचा मृतदेह आढळला आहे ती जुन्नरमधीलच रहिवासी आहे.
संबंधित मुलगी ही अल्पवयीन असल्याचं बोललं जातंय. ती रामचंद्र यांची नात्यातील होती. हे दोघे गेल्या आठवड्याभरापासून गायब होते. अशातच रामचंद्र यांची गाडी तीन-चार दिवसांपासून जुन्नरमधील कोकण कड्यावर उभी असल्याचे तेथील ग्रामस्थांना दिसले. तसेच याच गाडीजवळ पायातील चपलांचा जोड आढळून आल्याने ग्रामस्थांचा संशय बळावला होता.
त्यानंतर कोकण कड्याच्या खोल दरीत शोध घेण्यात आला. या शोधानंतर सुमारे बाराशे फुटावर मृतदेह दोन आढळले आहेत. याबाबत जुन्नर पोलिसांना कळविण्यात आले आहे. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने दोन्ही मृतदेह खोल दरीतून बाहेर काढले आहेत. यात मुलीचा मृतदेह बाराशे फुटांवर, तर रामचंद्र यांचा मृतदेह तेराशे पन्नास फुटांवर सापडला.
दरम्यान, मुलीचं अपहरण झाले असल्याची तक्रार नातेवाईकांनी 15 जून रोजी जुन्नर पोलिसांकडे केली होती. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत होते. एकीकडे पोलीस तपास करत असताना दुसरीकडे या दोघांचेही मृतदेह दरीत आढळले आहेत. या दोघांनी आत्महत्या केली असावी असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. मात्र पोलीस सर्व बाबी पडताळण्याचे काम करत आहेत.