
पुणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंढवा-केशवनगर सारख्या परिसरात वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. रस्त्यांवर वाहनांची मोठी गर्दी झाल्याने प्रवाशांना कामावर जाण्यासाठी किंवा घरी परतण्यासाठी बराच वेळ लागतो. यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. आता याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे दौऱ्यावर असताना एका स्थानिक महिलेने वाहतुकीच्या समस्येवरुन थेट प्रश्न विचारला. यावेळी तिने गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे उदाहरण देत अजित पवारांना अचानक पाहणी करण्याचा सल्ला दिला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील मुंढवा-केशवनगर पुलाच्या पाहणीसाठी गेले होते. या परिसरात अनेकदा वाहतूक कोंडी होताना दिसते. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. यावेळी एका महिलेने अजित पवारांना गाठून वाहतुकीच्या समस्येबद्दल आपली तक्रार मांडली. यावेळी ती महिला म्हणाली, “जसे पर्रिकर वाहतूक व्यवस्था पाहण्यासाठी अचानक फिरायचे, तसेच तुम्ही पण कधीतरी माहिती न देता अचानक या म्हणजे तुम्हाला या ठिकाणी खरी परिस्थिती कळेल. आता तुम्ही प्रश्न विचारणार आणि आम्ही उत्तर देणार, हा या समस्येवर उपाय नाही.” अशा शब्दात त्या महिलेने संताप व्यक्त केला.
त्यावर महिलेने मनोहर पर्रिकर यांचे नाव घेतल्यावर अजित पवारांनी तात्काळ विचारले. “पर्रिकर कोण?” यावर महिलेने, “गोव्याचे मंत्री,” असे म्हटले. यानंतर अजित पवारांनी “मला मान्य आहे माझ्याकडून चूक झाली, मात्र मला तुम्हाला सांगायचे आहे की मी काम करायला आलो आहे, त्यामुळे मला काम करू द्या,” असे म्हटले. या सर्व संभाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दौऱ्यादरम्यान केवळ वाहतूकच नव्हे तर इतरही अनेक समस्या समोर आल्या. यावेळी त्यांनी वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी मुंढवा चौकात वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष चर्चा केली. या भागात सिग्नल व्यवस्था योग्यरित्या काम करत नसल्याचे सांगितल्यानंतर त्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना सिग्नल यंत्रणा सुरळीत करण्याचे आणि गर्दीच्या वेळी अतिरिक्त वाहतूक पोलीस तैनात करण्याचे निर्देश दिले.