Pune accident : बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रक अन् पीएमपीचा अपघात; पुण्यातल्या चांदणी चौकातली घटना

| Updated on: Jul 28, 2022 | 2:48 PM

या अपघातामुळे साताऱ्याला जाणारा रस्ता जवळपास दोन तास पूर्ण बंदच झाला होता. परिणामी साताऱ्याला जाणारी वाहतूक बावधन बाजूला ठप्प झाली होती. दुसरीकडे मुळशी, पाषाण, बावधन या बाजूने कोथरूडला वाहने येऊ शकत नव्हती.

Pune accident : बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात ट्रक अन् पीएमपीचा अपघात; पुण्यातल्या चांदणी चौकातली घटना
ट्रक आणि पीएमपी बस अपघात
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : चांदणी चौक येथे ट्रक आणि बसचा सकाळी अपघात (Pune accident) झाला. यात दोघेजण जखमी झाले आहेत. मुंबई-बंगळरू महामार्गावर चांदणी चौक येथे गुरुवारी सकाळी बसच्या पुढे जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रक आणि पीएमपी बसचा अपघात घडला. या अपघातात ट्रकचालक आणि पीएमपी (PMPML) बसमधील प्रवासी जखमी झाला आहे. दरम्यान, या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अपघात गुरुवारी सकाळी पावणे आठच्या दरम्यान घडला. महामार्गावर चांदणी चौक येथील प्रथमेश एलाईट या इमारतीसमोर वारजेच्या दिशेने जाणाऱ्या पीएमपी बसच्या पुढे जाण्याचा प्रयत्न ट्रक करीत होता. त्यावेळी ट्रक बसला घासत थेट दुभाजकावर (Divider) जाऊन आदळला. या अपघातामुळे पीएमपी बसचे मोठे नुकसान झाले आहे.

साताऱ्याकडे जाणारी वाहतूक बराच वेळ ठप्प

ऐन महामार्गावर हा अपघात घडला. दोन्ही वाहने एकमेकांना धडकली. त्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. साताऱ्याकडे जाणारी वाहतूक या अपघातामुळे बराच काळ ठप्प झाली होती. तर कोथरूडकडे जाणाऱ्या वाहतुकीवरही परिणाम झाला होता. दोन्ही अपघातग्रस्त वाहने अथक प्रयत्नानंतर दूर करण्यात आली. वाहतूक बराच काळ संथगतीने सुरू होती. मुंबई-बंगळुरू महामार्गावरील चांदणी चौकात असलेल्या प्रथमेश एलाईट या इमारतीसमोर गुरुवारी सकाळी पावणे आठच्या सुमारास पीएमपी बस आणि ट्रक एकमेकांना धडकले.

हे सुद्धा वाचा

वारजे वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचत वाहने हटवली

या अपघातामुळे साताऱ्याला जाणारा रस्ता जवळपास दोन तास पूर्ण बंदच झाला होता. परिणामी साताऱ्याला जाणारी वाहतूक बावधन बाजूला ठप्प झाली होती. दुसरीकडे मुळशी, पाषाण, बावधन या बाजूने कोथरूडला वाहने येऊ शकत नव्हती. त्यामुळे ऐन कामाच्या वेळेलाच नागरिकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत मनस्ताप सहन करावा लागला. अपघात घडल्यानंतर काही वेळातच वारजे वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर दोन्ही वाहने रस्त्यावरून हटवण्यात आली. मात्र बराच वेळ वाहतूक संथगतीने सुरू होती.