Ajit Pawar: आता खाली माना घालून हसू नका, आधी तसले धंदे बंद करा; अजित पवारांनी टोचले इच्छुक उमेदवारांचे कान

| Updated on: Dec 10, 2021 | 8:16 PM

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याची सेटिंग लावण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कान टोचले आहेत.

Ajit Pawar: आता खाली माना घालून हसू नका, आधी तसले धंदे बंद करा; अजित पवारांनी टोचले इच्छुक उमेदवारांचे कान
ajit pawar
Follow us on

पिंपरी-चिंचवड: महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तिकीट मिळण्याची सेटिंग लावण्यासाठी आलेल्या इच्छुक उमेदवारांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक शब्दात कान टोचले आहेत. आता मान खाली घालून हसू नका. विरोधकांना मदत करणं बंद करा. आधी तसले धंदे बंद करा, अशा शब्दात अजित पवार यांनी खास आपल्या स्टाईलने या भावी नगरसेवकांचे कान उपटले.

राष्ट्रवादीचे काही इच्छुक उमेदवार अजित पवारांना निवेदन देण्यासाठी आले होते. त्यावेळी अजितदादांनी त्यांना खास आपल्या शैलीने फटकारले. गट तट बाजूला ठेवा. विरोधकांना मदत करणं बंद करा. मला पिंपरी चिंचवड शहरातील खडानखडा माहिती आहे. आता खाली माना घालून हसू नका. आधी तसले धंदे बंद करा, असा सज्जड दमचं पवारांनी या कार्यकर्त्यांना भरला.

मी सर्वांना सोबत घेऊन जाणारा

मी इथं आलो तर मला लगेच गराडा घातला. दादा बघा, दादा बघा… आता का बघा? तर निवडणुका जवळ आल्या म्हणून बघा. दादांचं माझ्याकडे लक्ष आहे का? हे आता बघतायेत. आता त्यांना चुकल्याचं कळतंय, असं फटकारतानाच पण ठीक आहे. मी सर्वांना सोबत घेऊनच पुढं जाणार आहे, असं म्हणत अजितदादांनी या कार्यकर्त्यांना गोंजारण्याचा प्रयत्नही केला.

काँग्रेसचा प्रश्न कधीच मिटलाय

महाविकासआघाडी असल्याने आता तिकीट वाटप कसं होणार अशी तुम्ही चर्चा करत असालच. काँग्रेसच्या नेत्यांनी आधीच स्वबळावर लढणार हे जाहीर केलंय. हे मी नव्हे तर त्यांनीच आधीच सांगितलंय. त्यामुळे तो प्रश्न मिटलाय. कारण ते आता स्वबळावर लढणार आहेत. आता इथं (पिंपरी चिंचवडमध्ये) कोणाचं किती बळ आहे आणि कोणाचं काय आहे? याचा आपण पंचनामा करायला नको. प्रत्येकाचं बळ चांगलं आहे, अशाच आपण प्रत्येकाला शुभेच्छा देऊयात. पण शिवसेनेची इथं राष्ट्रवादी सोबत जाण्याची तयारी आहे, असं मी बातमीत वाचलं. ज्यावेळी आपले मित्र पक्ष समन्वयाची भूमिका घेतात, तेव्हा आपण ही दोन पावलं मागे जात पुढं जायचं असतं. तशी मानसिकता आपण ठेवायची असते, असं ते म्हणाले.

ताकदीवर तिकीट वाटप व्हावं

जे आपल्या सोबत येऊ इच्छितात त्यांनी राष्ट्रवादीची आणि स्वतःची इथं किती ताकद आहे हे पाहावं. त्या ताकदीच्या प्रमाणावर जागा वाटप झालं तर आपली काहीच हरकत नाही. एखादया ठिकाणी ते एक-दोन पावलं मागे होतील, एखादया ठिकाणी आपण एक-दोन पावलं मागे होऊयात. शेवटी आपलं सर्वांचं पहिलं ध्येय पिंपरी चिंचवड पालिकेतून भाजपची सत्ता घालवायची हेच आहे. त्यामुळे ही भूमिका घेऊन तुम्हाला आणि मला पुढं जायचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

Omicron : बाप रे! राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 नवे रुग्ण सापडले, मुंबईत 3, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 रुग्ण सापडल्याने टेन्शन वाढलं

जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न ; एकूण 793 कोटी 86 लाखाच्या प्रारुप आराखड्यास मान्यता

Pune : पुण्यात राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढणार, महादेव जानकरांची भाजपपासून फारकत?