Sharad Pawar : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीत मविआबाबत चर्चा?; शरद पवारांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले…

| Updated on: Oct 22, 2023 | 12:05 PM

Sharad Pawar on Prakash Ambedkar Meet YB Chavan Center and Chandrashekar Bawankule : प्रकाश आंबेडकरांसोबतच्या भेटीत नेमकी कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली? शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलंय. बारामती विधानसभेवर दावा करणाऱ्या बावनकुळेंना पवारांना फटकारलं; म्हणाले, भाजपने ज्यांना तिकीटही दिलं नाही, त्यांना...

Sharad Pawar : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतच्या भेटीत मविआबाबत चर्चा?; शरद पवारांचं स्पष्ट भाष्य, म्हणाले...
sharad pawar
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बारामती | 22 ऑक्टोबर 2023 : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यात भेट झाली. या भेटीत प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीत यावं, अशी चर्चा झाल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात आहे. यावर शरद पवार यांनी स्पष्ट भाष्य केलं आहे. आमच्या इंडिया आघाडीत कुणी सामील होत असेल तर त्याचा आम्हाला आनंदच असेल. पण प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही काल बैठक झाली. ती बैठक आघाडीत सामील होण्यासाठी नव्हती, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं. ही भेट राजकीय नसल्याचंही शरद पवार म्हणालेत.

बाबासाहेब आंबेडकर यांनी एक ग्रंथ लिहिला आहे. जेव्हा आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात होते. त्या ग्रंथाला 100 वर्षे झाली. म्हणून यशवंतराव चव्हाण सेंटरला एक कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमात मी बोलणार होतो. प्रकाश आंबेडकरही त्या कार्यक्रमात होते. तिथं त्याविषयीच फक्त बोलणं झालं. राजकारणावर आम्ही बोललो नाही, असं शरद पवार म्हणाले.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामतीच्या जागेवर दावा केला आहे. बारामतीची लोकसभेची जागा महायुतीच जिंकेल, असा विश्वास चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलाय. त्यावरून शरद पवारांनी बावनकुळे यांना फटकारलं आहे. बातमी जर वृत्तपत्रात यायची असेल तर बारामतीचं नाव घेतलं जातं. मागच्या निवडणुकीत त्यांच्या त्यांना पक्षाने त्यांना तिकीट दिलं नव्हतं. ज्यांच्या स्वत:च्या पक्षालाही ते तिकीट देण्याच्या लायक वाटत नाहीत, या व्यक्तीवर आपण काय भाष्य करायचं?, असं म्हणत शरद पवारांनी बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे.

पाच राज्यामध्ये निवडणुका होत आहेत. तिथं लोकं भाजपला बाजूला करतील. भाजपच्या विरोधात लोकांना कौल दिसतोय, असं म्हणत शरद पवार यांनी पाच राज्यातील विधासभा निवडणुकीवर भाष्य केलं. आमदार वाढीसंदर्भात आताच निर्णय होईल. असं मला वाटत नाही. आमदारांची संख्या वाढण्याच्या निर्णयाला 2029 उजाडणार, असं वाटतंय. त्यामुळे त्यावर आता भाष्य करणं योग्य नाही, असं शरद पवार म्हणाले.

मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगे आणि राज्य सरकार यांच्यात सुसंवाद असायला पाहिजे. राज्य सरकार काय करतंय याकडे आमचं लक्ष आहे, असंही पवार म्हणाले.