सोलापूरच्या उपमहापौरांवर आधी खंडणीचा गुन्हा आता पक्षाची शिस्तभंग नोटीस, पुढे काय होणार?

| Updated on: Dec 31, 2020 | 6:58 AM

सोलापूर महापालिकेतील भाजपचे उपमहापौर राजेश काळे अडचणीत सापडले असून त्यांना आता पक्षाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे.

सोलापूरच्या उपमहापौरांवर आधी खंडणीचा गुन्हा आता पक्षाची शिस्तभंग नोटीस, पुढे काय होणार?
Follow us on

सोलापूर : सोलापूर महापालिकेतील (Solapur Mahapalika) भाजपचे उपमहापौर राजेश काळे (Rajesh Kale) अडचणीत सापडले असून त्यांना आता पक्षाने शिस्तभंगाची नोटीस बजावली आहे. बुधवारी काळे यांच्याविरोधात सरकारी अधिकाऱ्यांना शिवीगाळ करणं तसंच खंडणी मागणे, असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. त्यानंतर पक्षाने त्यांच्याविरोधात अ‌ॅक्शन घेत त्यांना शिस्तभंगाच्या कारवाई संदर्भात नोटीस बजावली आहे. (BJP issued a disciplinary notice to Solapur Deputy Mayor Rajesh Kale)

उपमहापौर राजेश काळे यांनी महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, उपायुक्त धनराज पांडे, विभागीय अधिकारी निलकंठ मठपती यांना शिवीगाळ केली. तसंच उपायुक्त पांडे यांच्याकडे खंडणी मागितल्याचा काळे यांच्यावर आरोप आहे. बेकायदेशीर कामासाठी राजेश काळे अनेक दिवसांपासून पालिका अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. त्यातूनच त्यांनी खंडणीची मागणी केली, असा आरोप महापालिका उपायुक्त पांडे यांनी केलाय. काळे यांच्याविरोधात सोलापूरच्या बझार पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

उपमहापौर काळे यांच्याविरोधातले सगळे गंभीर आरोप लक्षा घेता भाजप शहराध्यक्ष विक्रम देशमुख यांनी काळेंना शिस्तभंगाची नोटीस बजावून झालेल्या प्रकाराचा 24 तासाच्या आत खुलासा करण्याचे पक्षातर्फे आदेश दिले आहेत. उपमहापौरपदासारखं महत्त्वाचं पद भूषवत असताना पदाला साजेसं वर्तन केलं नसल्याचं नोटीसीत म्हटलं आहे.

काळे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. अनेक वेळा ते अधिकाऱ्यांना फोन करुन बेकायदेशीर कामासाठी दबाव आणतात, असा आरोप त्यांच्यावर आहे. शासकिय अधिकाऱ्यांना नियमात काम करु न देणं, त्यांच्या कामात सतत व्यत्यय आणून आपल्या मर्जीप्रमाणे काम करण्यासाठी त्यांना धमकावणं असे गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत.

नेमकं काय आहे सविस्तर प्रकरण…

माजी मंत्री सुभाष देषमुख यांच्या लोकमंगल समुहाच्यावतीने आयोजित सामुहिक विवाह सोहळ्यासाठी ई टॉयलेट कचरापेट्या आणि अन्य साहित्याची व्यवस्था करण्यासाठी राजेश काळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोन केला. प्रशासकीय मान्यतेशिवाय पालिकेची मालमत्ता कुठेही पाठवता येणार नाही. ई-टॉयलेट कचरापेट्या आणि इतर साहित्याची व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करणं अपेक्षित असल्याचं पालिका अधिकाऱ्यांचं मत होतं. अधिकाऱ्यांच्या मतावरुन संतापलेल्या उपमहापौर राजेश काळे यांनी पालिका आयुक्त, उपायुक्त, विभागीय अधिकारी यांना फोन करुन शिवीगाळ केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

काळे यांच्या मनमानी कारभाराला भाजपचे नगरसेवकही कंटाळले आहेत. काळेंविरोधात भाजपच्या नगरसेवकांमध्येही मोठा रोष आहे, अशी चर्चा आहे. आता काळेंवर पक्ष काय कारवाई करतो, हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे. (BJP issued a disciplinary notice to Solapur Deputy Mayor Rajesh Kale)

हे ही वाचा

सोलापूरच्या उपमहापौरांची अधिकाऱ्यांना शिवीगाळ?, खंडणीचा गुन्हा दाखल