‘ही’ मागणी पूर्ण करा, अन्यथा मी माझ्या कुटुंबासह आंदोलन करणार, छगन भुजबळ आक्रमक

| Updated on: Nov 28, 2022 | 3:16 PM

छगन भुजबळ यांचा राज्य सरकारला इशारा

ही मागणी पूर्ण करा, अन्यथा मी माझ्या कुटुंबासह आंदोलन करणार, छगन भुजबळ आक्रमक
Follow us on

पुणे : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी सहकुटुंब आंदोलनाचा इशारा दिला आहे. सावित्रीबाई (Savitribai Phule) आणि ज्योतिबा फुले (Jyotiba Phule) यांचं नाव आपण अभिमानानं घेतो. पण त्यांनी जिथं शिक्षणाचं मोठं कार्य उभारलं त्या भिडेवाड्याची आजची अवस्था वाईट आहे. मी आजदेखील मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना त्याची बैठक घ्यायला सांगितलं आहे. त्या दोघांनीही लवकरच पुण्यात यासंदर्भात बैठक घेऊ असं सांगितले आहे. थोडे दिवस वाट बघू, अन्यथा आंदोलन अटळ आहे, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणालेत.

मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलंय. त्यामुळे थोडे दिवस थांबू. वाट बघू अन्यथा आंदोलन करु. मी माझ्या कुटुंबासह या आंदोलनात सहभागी होणार आहे. लवकरात लवकर भिडेवाड्याचं काम पुर्ण होणं गरजेचं आहे, असं भुजबळ म्हणालेत.

महात्मा ज्योतिबा फुले यांचा आज स्मृतिदिन आहे. पुण्यातील महात्मा ज्योतिराव फुले वाड्यात स्मृतिदिन साजरा झाला. त्यानिमित्त यंदाचा समता पुरस्कार डॉ. यशवंत मनोहर यांना देण्यात आला आहे. माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर ही या कार्यक्रमाला उपस्थित आहेत.

मी गेली अनेक वर्षे सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या विचारांच्या प्रचारासाठी प्रयत्न करत आहे. त्याचमुळे मंत्रालयात आता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावण्यात आल्या आहेत. फुले यांचा विचार समाजाला दिशा देणारा होता. पण त्यांच्या बाबतीत काहीही कार्य करायचं असेल ते सहजासहजी कधीचं नाही होत आपोआप तर अजिबातच होत नाही. त्यासाठी विशेष कष्ट घ्यावे लागतात. भिडेवाड्याच्या डागडुजीसाठीही मी आग्रही आहे. सरकारकडून या संदर्भात मदतीची अपेक्षा आहे, असं भुजबळ म्हणालेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आपण लावतो. आंबेडकरांच्या लावतो पण महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा लावताना अडचणी येतात.पुणे विद्यापीठाला नाव देताना देखील अशाच अनेक अडचणी आल्या होत्या. पण भिडेवाड्याच्या कार्याबाबत मी स्वत:पाठपुरावा करेन, असं भुजबळ म्हणालेत.