मुलींच्या पहिल्या शाळेचं संवर्धन नाहीच, भुजबळांकडून भिडे वाड्याबाबत महत्त्वाचे आदेश

| Updated on: Feb 12, 2021 | 2:39 AM

गेल्या 10 वर्षांपासून पुण्यातील भिडे वाडा प्रकरणात तोडगा निघाला नसल्यानं छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे आदेश दिलेत.

मुलींच्या पहिल्या शाळेचं संवर्धन नाहीच, भुजबळांकडून भिडे वाड्याबाबत महत्त्वाचे आदेश
Follow us on

पुणे : पुण्यातील भिडेवाडा येथे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. या वास्तुचं अद्यापही संवर्धन करण्यासाठी ही वास्तू स्मारकामध्ये रुपांतरित करण्यात आलेली नाही. ही वास्तू तातडीने स्मारकात रुपांतरीत करणं आवश्यक आहे. मात्र गेल्या 10 वर्षांपासून या प्रकरणात तोडगा निघाला नसल्यानं छगन भुजबळ यांनी महत्त्वाचे आदेश दिलेत. यानुसार सांस्कृतिक कार्य विभागाला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या समितीचं गठन करावं,” अशी सूचना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली (Chhagan Bhujbal order to form committee on Bhide Wada Pune).

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेची वास्तू असणारा भिडेवाडा स्मारकामध्ये रुपांतर करण्यासंदर्भातील बैठक मंत्रालयात आयोजित करण्यात आली. या बैठकीला सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख, आमदार रोहित पवार, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून भूसंपादनाचे काम पाहणारे संबंधित अधिकारी यांच्यासह नगरविकास विभागाचे उपसचिव सतिश मोघे, सांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरात आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.


वास्तुत राहणाऱ्या भाडेकरुंची 10 वर्षांपूर्वी न्यायालयात धाव

अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ म्हणाले, “भिडेवाडा ही वास्तु खासगी मालकीची आहे. तसेच या वास्तुत राहणाऱ्या भाडेकरुंनी 10 वर्षांपूर्वी न्यायालयात धाव घेतल्याने हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. याबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी त्वरित समिती नेमण्यात यावी. या समितीमध्ये नगरविकास, सांस्कृतिक कार्य आणि महसूल विभागाचे संबंधित अधिकारी यांच्यासह पुणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांचा समावेश असावा.”

न्यायालयाच्या बाहेर भाडेकरुंच्या संमतीने प्रयत्न करणार

“भिडेवाडा पुणे महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी काय करता येईल आणि या प्रकरणात न्यायालयाच्या बाहेर संमतीने काय करता येईल याबाबतची शक्यताही समितीमार्फत तपासण्यात यावी,” असे निर्देश भुजबळ यांनी दिले. सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आवश्यक असणारी समिती नेमण्याबरोबरच येत्या 15 दिवसात याविषयाबाबत पुढील बैठक बोलवण्यात येईल असं सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी स्पष्ट केले.

पुढील बैठकीसाठी संबंधित विभागांबरोबरच ॲडव्होकेट जनरल यांनाही बोलवण्यात येईल. फुले दाम्पत्याने भिडेवाडा येथे सुरु केलेल्या मुलींच्या शाळेची वास्तू सांस्कृतिक कार्य आणि पुरातत्व विभागामार्फत राज्य स्मारक म्हणून घोषित करण्यासंदर्भातही शासन सकारात्मक असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

हेही वाचा :

फुले दाम्पत्याच्या संघर्षमय जीवनाचा आढावा, ज्योती सावित्री नाट्यमालिकेचं रंगमंचावर आगमन

‘दारासमोर रांगोळी, घरावर आकाश कंदील आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती’, महाराष्ट्रात घरोघरी सावित्री उत्सव साजरा

महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या त्यागामुळेच राज्यात शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक परिवर्तनाची नांदी : उद्धव ठाकरे

व्हिडीओ पाहा :

Chhagan Bhujbal order to form committee on Bhide Wada Pune