Weather Update | ऑक्टोबर हिटचे चटके, यंदा उन्हाळ्यात जाणवणार, IMD चा अंदाज

| Updated on: Oct 16, 2023 | 8:03 AM

Weather Update | यंदा पावसाळा समाधानकारक झाला नाही. देशातील अनेक भागांत सरासरी इतका पाऊस झाला नाही. त्यानंतर आता राज्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. यामुळे यंदा उन्हाळा कसा असणार आहे, त्याचा अंदाज...

Weather Update | ऑक्टोबर हिटचे चटके, यंदा उन्हाळ्यात जाणवणार, IMD चा अंदाज
Follow us on

पुणे | 16 ऑक्टोंबर 2023 : राज्यात यंदा उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने अखडता हात घेतला. नेहमीप्रमाणे मान्सून बरसलाच नाही. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाची तूट निर्माण झाली. त्यानंतर परतीचा पावसाचा प्रवास राज्यात पूर्ण झाला आणि ऑक्टोबर हिट जाणवू लागली. राज्यातील सर्वच शहरात ऑक्टोबर हिटमुळे नागरिक घामघूम होऊ लागले आहे. राज्यातील अनेक शहरांचे तापमान ३५ अंश सेल्सियसच्या जवळपास गेले आहे. अकोल्यात सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे आता उन्हाळा कसा असणार? यासंदर्भातील अंदाज हवामान विभागाने जारी केला आहे.

राज्यातील तापमान वाढणार

राज्यात ऑक्टोबर हिट जाणवू लागली आहे. आता ऑक्टोंबर हिट अधिकच जाणवणार आहे. परंतु दोन, तीन दिवस राज्यातील अनेक शहरांत ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे दोन, तीन दिवस तरी वाढत्या तापमानातून दिलासा मिळणार आहे. पुणे शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले आहे. मुंबईत तापमानाचा पारा ३४ अंशावर होते. विदर्भात अधिक तापमान होते. अकोल्यात राज्यातील सर्वाधिक ३७.८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सध्या १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान राज्यातील वातावरण ढगाळ राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

यंदा उन्हाळा कसा असणार

ऑक्टोबर हिट जास्त जाणवत आहे. त्यामुळे यंदाचा उन्हाळा कसा असणार? हा प्रश्न राज्यातील नागरिकांना पडला आहे. पुणे हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले की, यंदाचा उन्हाळा हा अधिक दाहक असण्याची शक्यता आहे. उन्हाळ्यात पहाटेचे किमान तापमान ३ ते ४ डिग्रीने अधिक असण्याची शक्यता आहे. दुपारच्या तापमानातही २ डिग्रीने वाढ होण्याची शक्यता आहे.

राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता

देशातून पूर्णपणे मान्सून परतला नाही. काही भागात परतीचा मान्सून अजून राहिला आहे. सध्या तामिळनाडूमध्ये चक्रीय वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम राज्यातील वातावरणावर झाला आहे. यामुळे येते ३ दिवस मुंबई, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांत ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच काही ठिकाणी तुरळक पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.