मुख्यमंत्र्यांचा नाना पटोले यांना फोन, तरीही पटोले म्हणतात, कसब्यातून लढणार; कारण काय?

कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. पक्ष अध्यक्ष म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. आज रात्रीपर्यंत उमेदवार फायनल होईल. उद्या अर्ज भरू.

मुख्यमंत्र्यांचा नाना पटोले यांना फोन, तरीही पटोले म्हणतात, कसब्यातून लढणार; कारण काय?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Feb 05, 2023 | 12:58 PM

पुणे: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन करून कसब्यातून उमेदवार न देण्याचं आवाहन केलं आहे. एखाद्या लोकप्रतिनिधीचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना उमेदवारी दिली जाते. त्यामुळे या पोटनिवडणुकीत उमेदवार दिला जात नाही. ही आपली परंपरा आहे, असं एकनाथ शिंदे यांनी पटोले यांना सांगितलं. मात्र, पटोले यांनी कसब्यातून लढणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. कसब्यातून भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवार दिला नाही. त्यामुळे परंपरेचा मुद्दाच निकाली निघाला असून आम्ही कसब्याची जागा लढवणार आहोत, असं नाना पटोले यांनी सांगितलं.

मला मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता. कसब्यासाठी त्यांचा फोन आला होता. त्यांनी परंपरा सांगितली होती. कुटुंबातील कोणी जातो तर आपण ती जागा बिनविरोध निवडून देतो, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. पण कसब्यातील तो वाद संपला. भाजपने कसब्यातून कुटुंबात उमेदवारी दिली नाही.

त्यामुळे आम्ही कसब्याची तयारी करत आहोत. कसब्यातून काँग्रेसचा उमेदवार असणार आहे. पक्ष अध्यक्ष म्हणून मी या निवडणुकीत लक्ष देत आहे. ही निवडणूक आम्हाला जिंकायची आहे. आज रात्रीपर्यंत उमेदवार फायनल होईल. उद्या अर्ज भरू, असं नाना पटोले यांनी स्पष्ट केलं.

चिंचवड राष्ट्रवादीकडे

चिंचवडचं मला माहीत नाही. चिंचवडची जागा राष्ट्रवादी लढत आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही राष्ट्रवादीसोबत आहोत, असं पटोले यांनी सांगितलं. कसब्याबाबत प्रस्ताव देण्याची विनंती मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. पण भाजपने टिळक कुटुंबातून उमेदवारी न दिल्याने आता तो प्रश्नच राहिला नाही, असंही ते म्हणाले.

मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

यावेळी पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांच्या सरकारची तक्रार केली. सरकार म्हणून तुम्ही बरोबर वागत नाही. सत्तेत आल्यापासून तुम्ही आमची कामं थांबवली आहेत. यापूर्वी अशी कामं थांबवली गेली नव्हती, असं मुख्यमंत्र्यांना सांगितल्याचं ते म्हणाले.

संध्याकाळी नाव जाहीर करू

कसब्याच्या उमेदवारीबाबत आज संध्याकाळपर्यंत काँग्रेसचं नावं निश्चित होईल. उद्या काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. माझं उद्धव ठाकरेंशी बोलणं झालं आहे. आज अजित पवार, जयंत पाटील यांच्याशी चर्चा करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.