Pune Rain : पहिल्याच पावसाचा पुण्याला आडवा तिडवा तडाखा, घराबाहेर पडू नका, अजित दादांचं ट्विट काय

Pune Rain Update : राज्यभर मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली आहे, मात्र पुण्यामध्ये आज संध्याकाळी ढगफुटी सारखा पाऊस अचानकपणे झाल्याने सर्वांची तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले तर झाडे पडली असून काहींच्या बिल्डिंगमध्ये पाणी शिरलं आहे. पालकमंत्री अजित पवार यांनी पुणेकरांना बाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.

Pune Rain : पहिल्याच पावसाचा पुण्याला आडवा तिडवा तडाखा, घराबाहेर पडू नका, अजित दादांचं ट्विट काय
| Updated on: Jun 08, 2024 | 9:20 PM

पुण्यामध्ये मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावल्याचं पाहयला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे पुणेकरांची तारांबळ उडाली. कमी वेळात जास्त पाऊस झाल्याने शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याचं दिसून आलं. रस्ते जलमय झाले, बसस्थानकांमध्येही पाणी साचलं तर अनेक ठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकही खोळंबली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना घराबाहेर पडू नका असं आवाहन केलं आहे.

अजित पवार यांचं आवाहन

पुणे शहर आणि परिसरात शनिवारी सायंकाळी मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली. पुणे शहरातील शिवाजीनगर, पाषाण भागात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त आणि पुणे जिल्हाधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन या विषयीची सविस्तर माहिती घेतली. कमी वेळेत जास्त पाऊस पडल्यामुळे काही ठिकाणी पाणी साचले आहे, त्याचा जनजीवनावर परिणाम झाला आहे. तरी प्रशासनाच्यावतीने तातडीने उपाययोजना करण्याच्या तसेच पावसात अडकलेल्या नागरीकांना मदत करुन पावसामुळे विस्कळीत झालेली वाहतुक सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी तसेच विस्कळीत झालेली वाहतुक तातडीने सुरळीत करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला दिल्या. या काळात नागरीकांनी शक्यतो घराच्या बाहेर पडू नये, अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. नागरीकांनी काळजी घ्यावी. तसेच येत्या पाच दिवसात राज्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस जोरदार हजेरी लावणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्याअनुषंगाने राज्यातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या असल्याचं अजित पवार म्हणाले.

 

शहरात सुरु असलेला मुसळधार पाऊस यामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास 25 ठिकाणी झाडपडीच्या घटनांची नोंद झाली असून उर्वरित झाडपडीची संख्या वाढत आहे. तीन ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना आहेत. दलाची अग्निशमन वाहने व जवान विविध वर्द्यांवर कर्तव्य बजावत असून कुठे कोणी जखमी किंवा जीवितहानी झालेली नाही.

शहरात काही ठिकाणी पाणी साचले असून झाडपडीच्या घटना घडल्या आहेत. महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना सर्व सूचना दिल्या असून महापालिकेचे सर्व यंत्रणा कामाला लागली असल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे.