
राज्यात सर्वत्र दिवाळीचा आनंद उत्साह पाहायला मिळत आहे. त्यातच आता दिवाळी उत्सवाला गालबोट लागल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मंडळाचा आकाशकंदील बांधण्यासाठी गेलेल्या एका तरुण कार्यकर्त्याचा तोल जाऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. संतोष कुसाळ असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. पुण्यातील वडगावशेरी परिसरात ही घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
संतोष कुसाळ हे पुण्यातील वडगावशेरी परिसरात गणेशनगर या भागात राहतात. संतोष हे राष्ट्रतेज तरुण मंडळाचे अनेक वर्षांपासूनचे अत्यंत सक्रिय आणि कार्यतत्पर सदस्य होते. कोणताही सण-उत्सव असो ते कायमच पुढाकार घ्यायचे. कोणताही कार्यक्रम त्यांच्या पुढाकाराशिवाय पूर्ण होत नसे. यंदाच्या दिवाळीसाठीही त्यांनी मंडळाच्या सजावटीत हातभार लावला होता. तसेच ऐतिहासिक किल्ला उभारणीच्या कामात मोठा वाटा उचलला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री उशिरा संतोष कुसाळ हे रस्त्यावर लावण्यासाठी मंडळाचा आकाशकंदील झाडावर चढून बांधत होते. हे काम सुरू असताना अचानक त्यांचा तोल गेला. त्यानंतर ते खाली कोसळले. त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान पहाटेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान संतोष यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले आहेत. एकीकडे आनंद आणि प्रकाशाचा सण साजरा होत असताना दुसरीकडे मात्र कुसाळ कुटुंबावर अंधार पसरला आहे. तसेच मंडळाचा एक आधारस्तंभ गमावल्यामुळे कार्यकर्त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करत आहेत. या परिसरातील अनेक नागरिक दिवंगत संतोष कुसाळ यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत. त्यांच्या निधनामुळे वडगावशेरी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यात दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवली या ठिकाणी दिवाळी पहाट कार्यक्रमाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. विशेषतः फडके रोड आणि ऐतिहासिक गणेश मंदिर परिसरात तरुणाईची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पहाटेपासूनच पारंपरिक वेशभूषेत आलेल्या हजारो तरुण-तरुणींनी गणरायाचे दर्शन घेत दिवाळीच्या शुभेच्छांची देवाणघेवाण करताना दिसत आहेत. सध्या सांस्कृतिक नृत्य, ढोल-ताशांचा गजर आणि भव्य रांगोळ्या-सजावटीमुळे संपूर्ण परिसर दुमदुमल्याचे पाहायला मिळत आहे.