Pune rain : कुठे झाडं उन्मळून पडली तर कुठे घरावरचं छप्पर उडालं; पुण्यातल्या पावसाचा जोर कमी होईना!

| Updated on: Aug 13, 2022 | 9:49 AM

पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.

Pune rain : कुठे झाडं उन्मळून पडली तर कुठे घरावरचं छप्पर उडालं; पुण्यातल्या पावसाचा जोर कमी होईना!
मुसळधार पावसामुळे भोरमध्ये उन्मळून पडलेले झाड
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे जिल्ह्यात सध्या मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. त्यामुळे विविध ठिकाणी झाडे उन्मळून पडण्याच्या, रस्त्यावर पाणी साठण्याच्या घटना घडत आहेत. घरांचेही नुकसान होत असल्याचे दिसून येत आहे. डोंगराळ भागातील ग्रामस्थांच्या घरांची छपरे उडून गेली (House blown off) आहेत. त्यामुळे अशा मुसळधार पावसात प्रचंड गैरसोय होत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. काही ठिकाणची वीज गायब झाली आहे. सततच्या पावसामुळे कामातही अडथळे निर्माण होत आहेत. धरणेही फुल्ल (Pune dams overflow) होत आहेत. अतिरिक्त पाणी सोडल्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पाऊस सुरूच राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दरम्यान, नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले असून नुकसान भरपाईची मागणी करीत आहेत.

झाडे उन्मळून पडली

भोर तालुक्यात मागच्या तीन दिवसांपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस पडला. या पावसामुळे 10 ते 12 ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या आहेत. प्रशासनाने तत्काळ झाडे रस्त्यावरून बाजूला करत रस्ते वाहतुकीसाठी खुले केलेत. दरम्यान, जोरदार वारा सुटलेला असताना झाडाखाली थांबू नये तसेच रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

‘भर पावसाळ्यात डोक्यावरचे छत गेल्याने राहायचे कुठे?’

नाणे मावळच्या डोंगराळ भागात सोमवडी गावातील शेतकऱ्याच्या घरावरचे छप्पर जोरदार वाऱ्याने उडून गेले आहे. त्याचप्रमाणे गावातील इतर शेतकऱ्यांच्या घराचेही नुकसान झाले. उल्हास बोडके या शेतकऱ्याच्या घरावरचे छप्पर जोरदार वाऱ्याने उडून गेले. तसेच मलंग पवार यांच्या घराचेही नुकसान झाले. या घटनांमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले आहे. भर पावसाळ्यात डोक्यावरचे छत गेल्याने राहायचे कुठे, असा प्रश्न या शेतकरी कुटुंबीयांपुढे निर्माण झाला आहे.

हे सुद्धा वाचा

‘नुकसान भरपाई मिळावी’

नाणे मावळात मागील चार दिवसांपासून जोरदार वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे. रात्री सर्व कुटुंब झोपेत असताना वाऱ्याचा वेग वाढल्याने घराची पत्रे, लोखंडी गजासह उडाल्याने सर्व कुटुंब भयभीत झाले. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.