पुण्यातील सुप्रसिद्ध बर्गर किंगवर एफडीएची कारवाई,थेट परवानाच केला रद्द
पुण्यातील हजारो खवय्यांच्या पसंदीचे ठिकाण असलेल्या बर्गर किंगवर एफडीएने कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे.

पुण्यातील कॅम्प परिसरात असलेल्या बर्गर किंगवर एफडीएने छापा टाकला आहे. या बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या गंभीर त्रुटी आढळल्यामुळे कारवाई करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. या कारवाईत बर्गर किंग कॅम्पचा परवाना एफडीएने रद्द केला आहे. या कारवाईने पुणेकरांमध्ये खळबळ उडाली आहे.
पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंग कॅम्पवर कारवाई करीत एफडीएने त्यांचा परवाना रद्द केल्याचे सांगण्यात येत आहे. बर्गर जॉईंटमध्ये खाद्यपदार्थांच्या स्वच्छते संदर्भात गंभीर त्रुटी आढळल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रेस्टॉरंट मधील अस्वच्छता या कारवाईचे प्रमुख कारण असल्याचे म्हटले जात आहे.
एफडीएचे आयुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी अन्न भेसळ खोरांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. तुकाराम मुंढे यांच्या पथकाने राज्यातील दूध, पनीर भेसळ, तूप आणि लोणी भेसळ आणि हॉटेल तसेच ढाबा चालकांवरही कारवाईचा आसूड उगारला आहे. मुंढे यांच्या कारवाईच्या भीतीने आता हॉटेल चालकांनी स्वयंपाक घरात स्वच्छ राखण्यास सुरुवात केली आहे. कालच चेंबुर वाशी नाका येथील पार्ले फ्रुट कंपनीच्या गोदामावर छापा टाकून कारवाई करण्यात आली होती. आज पुण्यातील प्रसिद्ध बर्गर किंगवरच एफडीएने छापा टाकल्याने खळबळ उडाली आहे.
चेंबुर वाशीनाका येथे धाड
अन्न आणि औषध प्रशासन विभागाने गुरुवारी मुंबईतील चेंबूर वाशीनाका परिसरात असलेल्या ‘पार्ले अॅग्रो’ कंपनीच्या गोदामावर अचानक धाड टाकली. या कारवाईत मुदत संपलेल्या फ्रुटी, अॅपे फिज, कोल्ड ड्रिंक्स आणि कॅन्डी ज्यूसचा 1 लाख रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त करण्यात आला आहे.
नाशिक येथे झेप्टोवर कारवाई
नाशिकमध्ये झेप्टोवर FDA ने मोठी काल कारवाई करीत सिडको येथील आस्थापनेचा अन्न परवाना निलंबित केला आहे. ‘सेफ फुड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेत अन्न आणि औषध प्रशासनाची ही कारवाई केली आहे. १३ ऑगस्ट रोजी FDA अधिकाऱ्यांनी झेप्टोच्या आस्थापनेची तपासणी केली तेव्हा स्वच्छता आणि आरोग्यविषयक निकषांचे उल्लंघन आढळले होते. अन्नसुरक्षा नियमांतील परिशिष्ट-४ चे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्याने अन्न परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.
आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी वैभव गर्दे आणि अमित रासकर यांनी ही कारवाई केली आहे. सह आयुक्त मंगेश माने आणि सहायक आयुक्त ज्ञानेश्वर महाले यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात येत असून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांवर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.