
पुणे शहरात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. शहरातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळत आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा पुणे वेधशाळेने वर्तवली होती. अचानक आलेल्या पावसानं पुणेकरांची तारांबळ उडालीये. शिवाजी नगर, जेएम रस्ता, हडपसर, सिंहगड रोड परिसर, वारजे या सर्व भागात जोरदार पाऊस होत आहे.
गेल्या दीड तासापासून सूरू असलेल्या पावसानं पुण्यातील आपटे रोड परिसरात पाणी साचले आहे. आपटे रोड परिसरतील रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. वाहन चालकांची पाण्यातून मार्ग काढताना कसरत होत आहे. पुणे महानगरपालिकेने केलेल्या नालेसफाईवर त्यामुळे प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पुण्यातील येरवडा परिसरात पाणीच पाणी झाले आहे. घरांमध्ये पाणी घुसल्यामुळे रहिवाश्यांचे हाल होत आहेत. घरातील पाणी काढण्याचे काम सुरू आहे. घरात पाणी शिरल्याने सामानाचे नुकसान झाले आहे. तासाभरात आलेल्या पावसामुळे पुणेकरांचे प्रचंड हाल झाले आहेत.
मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला आहे. अजून ही तो मुंबई आणि कोकणच्या किनारपट्टीवर पोहोचला आहे. येत्या पाच दिवसात महाराष्ट्रातील या भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
उष्णतेपासून नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. मान्सूनच्या आधीच पावसाने हजेरी लावल्याने लोकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पुणे रेल्वे स्टेशन परिसरात जोरदार पाऊस होत आहे. रस्त्यावर साचलेल्या पाण्यात पुणेकरांनी आनंद घेतला.
नैऋत्य मान्सून आता दक्षिण महाराष्ट्र, तेलंगणा, दक्षिण छत्तीसगड, ओडिशा आणि आंध्र प्रदेशात दाखल झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत मान्सून मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रात दाखल होणार आहे.
शहरात सुरु असलेला मुसळधार पावसामुळे अग्निशमन दलाकडे सद्यस्थितीत जवळपास २५ ठिकाणी झाड पडल्याच्या घटनांची नोंद झाली आहे. झाडपडण्याच्या घटना वाढत आहे. ३ ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या आहेत. अग्निशमन वाहने व जवान विविध वर्द्यांवर कर्तव्य बजावत असून कुठे कोणी जखमी किंवा जिवितहानी नाही.