Pune rain : पावसाचा जोर कमी होणार, मात्र पुढचे दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार; हवामान विभागाचा इशारा

| Updated on: Aug 17, 2022 | 11:37 AM

ईशान्य अरबी समुद्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशवर असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राची प्रणाली आता राजस्थानच्या पूर्वेला आणि पश्‍चिम मध्य प्रदेशवर पाहायला मिळत आहे.

Pune rain : पावसाचा जोर कमी होणार, मात्र पुढचे दोन दिवस काही ठिकाणी मुसळधार; हवामान विभागाचा इशारा
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुणे आणि सातारा (Pune rain) या जिल्ह्यातील घाट माथ्याच्या भागात 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. आयएमडीच्या (India Meteorological Department) अधिकाऱ्यांनी सांगितले, की गेल्या 24 तासांत पुण्यातील घाट भागात पावसाची तीव्रता कमी झाली आहे. गेल्या 24 तासांत भोर, लवासा आणि गिरीवन येथे अनुक्रमे 75.5 मिमी, 66 मिमी आणि 53 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मात्र, मुळशीतील ताम्हिणी घाट आणि परिसरात अजूनही मुसळधार पाऊस (Heavy rain) सुरू आहे. मंगळवारी सकाळी 8.30 वाजता संपलेल्या गेल्या 24 तासात ताम्हिणी घाट विभागात 121 मिमी आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यातील भीरा येथे 93 मिमी पाऊस झाला, असे IMD अधिकाऱ्यांनी सांगितले. लोणावळ्यात 62 मिमीहून अधिक पावसाची नोंद झाल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

ऑरेंज अलर्ट

आयएमडीने यापूर्वी घाट भागात ऑरेंज अलर्ट (विलग मुसळधार पाऊस) जारी केला होता. बुधवारपासून, दिवसभर ढगाळ वातावरणासह शहरात हलक्या पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. मंगळवारी दिवसभर शहरात ढगाळ आणि थंड वातावरण होते. कमी दाबाचा पट्टा जैसलमेर ते अग्नेय बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तरेकडे जाण्याची शक्यता आहे. त्यातच दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. परिणामी राज्यात पावसाचा जोरही ओसरणार आहे.

हे सुद्धा वाचा

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

ईशान्य अरबी समुद्रात सध्या चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. उत्तर छत्तीसगड आणि पूर्व मध्य प्रदेशवर असलेल्या तीव्र कमी दाब क्षेत्राची प्रणाली आता राजस्थानच्या पूर्वेला आणि पश्‍चिम मध्य प्रदेशवर पाहायला मिळत आहे. तर शुक्रवारपर्यंत (ता. 19) उत्तर बंगालच्या उपसागरात कमी दाब क्षेत्राची निर्मिती होऊ शकते. पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाट भागात 18 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, असे आयएमडीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे.