भाजप नेत्यांची आम्ही यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?; जयंत पाटलांचा सवाल

| Updated on: Sep 29, 2021 | 3:14 PM

महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. (jayant patil slams bjp over ed action against maha vikas aghadi leader)

भाजप नेत्यांची आम्ही यादी देतो, त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?; जयंत पाटलांचा सवाल
jayant patil
Follow us on

नगर: महाविकास आघाडीच्या नेत्यांवर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. भाजपमध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार?, असा सवाल जयंत पाटील यांनी केला आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन मीडियाशी संवाद साधला. महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचे षडयंत्र सध्या सुरू आहे आणि हे जाणीवपूर्वक सुरू आहे, असा आरोप करतानाच या देशात आणि राज्यात ज्यांनी खरंच मनीलॉड्रींग केलंय ते बाजुला राहिले आणि ज्यांच्यावर केंद्रीय एजन्सीने ठपका ठेवला ते भाजपमध्ये गेले आहेत. त्यांचं काय झालं? हे एकदा ईडीने जनतेला सांगावे, असं आवाहन पाटील यांनी केलं.

सर्व आरोप जाणूनबुजून

एकनाथ खडसे यांच्यावर जे आरोप लावण्यात आले आहेत, तो मनीलॉड्रींगचा प्रकार नाही. त्यांच्या जावयाने कर्ज काढून त्या जमीनीचा व्यवहार केला आहे. तर दुसरीकडे हसन मुश्रीफ यांच्या बाबतीतही लोकांनी कारखान्यात पैसे जमा केले आहेत. तरीही मनीलॉड्रींगचा प्रकार असल्याचा ठपका ठेवला गेला आहे. हे जाणूनबुजून केले जात आहे, असा दावा त्यांनी केला. अनिल देशमुख यांच्यावरही पैसे मागितल्याचा आरोप झाला. त्यांनी पैसे घेतले नाही असं अधिकारी भुजबळ व संजय पाटील या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, असंही त्यांनी सांगितलं.

निळवंडे धरणाचे काम वेगाने करणार

2014 ते 2019 याकाळात नगर जिल्ह्यातील महत्त्वाच्या अशा निळवंडे धरणाचे काम संथगतीने सुरू होते. महाविकास आघाडी सरकार राज्यात आल्यानंतर निळवंडे धरणाच्या कामाला प्रचंड गती मिळाली असून 2024 पर्यंत या प्रकल्पाच्या कालव्याची कामे पूर्ण करून या भागातील सिंचन क्षमतेत वाढ केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. अहमदनगर शहरातून जाणाऱ्या सिना नदीच्या पात्रातील निळ्या व लाल पूररेषेत सुधारणा व्हावी अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. एनजीटीच्या नियमात राहून जलसंपदा विभागाने नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करून निळी व लाल पूररेषेत किती सुधारणा होऊ शकते याचा अभ्यास करून मनपाला कळवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

प्रवरा कालवा बंदिस्त करा

श्रीरामपूर शहरातून जाणारा प्रवरा कालवा बंदिस्त करण्याची मागणी आमदार लहू कानडे यांनी केली. याबाबतचा प्रस्ताव सादर करून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना दिली. अकोले येथे उच्च पातळीच्या कालव्याचे काम सुरू आहे. या कामाला गती देण्यात यावी अशी मागणी आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केली. या विषयावर या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. लवकर याबाबत सकारात्मक पावले उचलेली जातील. कवठे या गावात मुळा नदीचा मुख्य कालवा नेहमीच फुटत असतो त्यामुळे कालव्याची वहन क्षमता कमी होते अशी तक्रार आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

 

संबंधित बातम्या:

जयंत पाटलांचा कामाचा झपाटा, दिवसभर अतिवृष्टीची पाहणी, भेटीगाठी अन् रात्री साडे दहा वाजता जलसंपदा विभागाची बैठक

आमचा दसरा कडवट झाला तर तुमची दिवाळी गोड होऊ देणार नाही; राजू शेट्टींचा इशारा

“चक्रीवादळ, अतिवृष्टी, महापुरामुळे आम्ही शेतकरी गेलो सरणावर…! अन् माझ्या सरणावरची फुले..” सदाभाऊ खोत यांचं राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवर टीकास्त्र

(jayant patil slams bjp over ed action against maha vikas aghadi leader)