Pune Leopard : संरक्षण दलाच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, भुंकणाऱ्या कुत्र्यांवर धावून जातानाचा व्हिडिओ व्हायरल

| Updated on: Sep 07, 2022 | 4:50 PM

संबंधित व्हिडिओ हा मंगळवारी रात्री साडे दहाच्या दरम्यानचा आहे. कुत्र्यांच्या आवाजानंतर एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला. दरम्यान, येथील झाडांवर बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे दिसून आले आहेत.

Pune Leopard : संरक्षण दलाच्या परिसरात बिबट्याचा मुक्त संचार, भुंकणाऱ्या कुत्र्यांवर धावून जातानाचा व्हिडिओ व्हायरल
खडकवासला परिसरात बिबट्याचा मुक्त संचार
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : पुण्यातील खडकवासला गावातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी या गावात बिबट्याचा (Pune Leopard) वावर वाढला आहे. बिबट्याचा काल रात्रीचा व्हिडिओ सध्या व्हायरल (Video Viral) झाला आहे. संरक्षण दलाशी संबंधित ही संस्था आहे. या संस्थेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टर्स संस्थेच्या परिसरातच आहेत. संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या कॉलनीत काल रात्री बिबट्या आला होता. कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज झाल्याने येथील कर्मचाऱ्यांनी बाहेर पाहिले असता त्यांना बिबट्या नजरेस पडला. त्यांनी या बिबट्याच्या हालचाली मोबाइच्या कॅमेऱ्यात कैद केल्या आहेत. एकूण 24 सेकंदांचा हा व्हिडिओ आहे. बिबट्याचा असा मुक्त संचार असल्याने येथील कर्मचारी सतर्क झाले आहेत. वनविभागाने (Forest Department) याठिकाणी तातडीने उपाययोजना कराव्या, अशी मागणी करण्यात आली आहे.

‘भांबुर्डा वनपरिक्षेत्राला कळविले’

या घटनेबाबत वन विभागाचे पुणे वनसंरक्षक असलेले राहुल पाटील म्हणाले, की खडकवासला गावातील डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ आर्मामेंट टेक्नॉलॉजी या ठिकाणी बिबट्या फिरत असल्याची माहिती आम्हालाही मिळाली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ आम्हाला प्राप्त झाला आहे. याबाबत भांबुर्डा वनपरिक्षेत्राचे अधिकारी प्रदीप संकपाळ यांनाही माहिती देण्यात आली आहे.

‘बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे’

संबंधित व्हिडिओ हा मंगळवारी रात्री साडे दहाच्या दरम्यानचा आहे. कुत्र्यांच्या आवाजानंतर एका कर्मचाऱ्याने हा व्हिडिओ शूट केला. दरम्यान, येथील झाडांवर बिबट्याच्या नख्यांचे ओरखडे दिसून आले आहेत. या ठिकाणी रेस्क्यू टीमलादेखील बोलविण्यात आले आहे, असे प्रदीप संकपाळ म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘स्थानिकांनी काळजी घ्यावी’

या व्हिडिओमध्ये बिबट्या झाडावरून खाली येताना दिसत आहे. काही कुत्री भुंकत असल्याने त्यांच्या मागे धावून जाताना बिबट्या दसून येत आहे. बिबट्याच्या संचारामुळे येथील नागरिक मात्र भयभीत झाले आहेत. स्थानिकांनी काळजी घ्यावी, लहान मुलांना एकटे सोडू नये, रात्रीच्या वेळी अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा, काही जाणवल्यास मोठा आवाज करा, अशा काही सूचना वनविभागाने स्थानिक नागरिकांना केल्या आहेत.