
सध्या मुंबईसह महाराष्ट्रात सर्वत्र पाऊस सुरु आहे. त्यातच आता गेल्या दोन दिवसांपासून पुणे शहरात आणि घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस सुरु आहे. पुण्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे प्रशासनाने खबरदारी म्हणून खडकवासला धरणातून मुठा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सध्या या धरणातून ३५,००० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. आता सकाळी ९ वाजता तो वाढवून ३९,००० क्युसेक करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील अनेक सोसायटीमध्ये पाणी शिरले असून नागरिकांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.
पुण्यात गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यातच धरणाचे पाणी सोडल्याने पुण्यातील एकता नगर परिसरात पाणी शिरले आहे. मुठा नदीचे पाणी सोसायटीच्या आवारात आणि काही घरांमध्ये घुसल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले आहे. अनेक नागरिकांना ट्यूब, बोट या सहाय्याने घराबाहेर काढले जात आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण दलाचे (NDRF) जवान आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी या बचावकार्यात सहभागी झाले आहेत. सध्या सोसायटीमधील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
एकता नगरमध्ये सध्या कंबरेइतके पाणी भरले आहे. त्यामुळे इमारतीत तळमजल्यावर राहणाऱ्या अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले आहे. या भागातील पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे बचावकार्य अधिक आव्हानात्मक बनले आहे. एनडीआरएफच्या जवानांनी बोटींच्या साहाय्याने पाणी भरलेल्या घरांमध्ये अडकलेल्या कुटुंबांना बाहेर काढले आहे. तसेच लहान मुले, वृद्ध आणि महिलांना प्राधान्याने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. प्रशासनाने नागरिकांना घरातच थांबावे आणि मदत पोहोचेपर्यंत धीर धरावा, असे आवाहन केले आहे. तसेच, नागरिकांना आवश्यक ती मदत तातडीने पुरवली जाईल, अशी ग्वाही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
त्यासोबतच पुण्यातील मुठा नदी दुथडी भरून वाहत असून, नदीकाठच्या वस्त्यांना आणि गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शनिवार पेठेतील प्रसिद्ध ओंकारेश्वर मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे, त्यामुळे ते भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आले आहे. पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनीही पूर परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
मावळ तालुक्यातही पावसाचा हाहाकार सुरू आहे. गोंडुंब्रे येथे एका महिलेचा मध्यरात्री नदीकाठी अडकून पडल्याचा आवाज ऐकून ग्रामस्थांनी तातडीने तळेगाव दाभाडे पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. मुसळधार पावसातही बचाव पथकाने एका झाडाला लटकलेल्या अवस्थेत असलेल्या त्या महिलेला सुखरूप बाहेर काढले. तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सद्यस्थितीत धरणसाखळीतील वाढता पाणीसाठा आणि नदीतील पाण्याची पातळी पाहता, प्रशासनाने नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.