
पुण्याच्या मुळशी येथील गावात राहणारी विवाहित महिला वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाने सर्वत्र खळबळ माजली आहे. संपूर्ण राज्यात या प्रकरणाची चर्चा सुरु आहे. हुंड्याच्या हव्यासापोटी वैष्णवीच्या सासरच्यांनी तिचा छळ केला. या सगळ्याला कंटाळून तिने स्वत:ला संपवले असे म्हटले जात आहे. वैष्णवीच्या मृत्यूला जबाबदार असणारे तिचे सासरे राजेंद्र हगवणे आणि पती सुशील हगवणे अजूनही फरार आहेत. हगवणे कुटुंबीयांनी त्यांची थोरली सून मयूरी जगताप हिचाही छळ केल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मयुरी यांनी आता त्यांच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देिली आहे. आपला छळ झाला तेव्हा महिला आयोगाकडे तक्रार केली होती, असा दावा मयुरी यांनी केला आहे. मात्र, महिला आयोगाकडून या वृत्ताला कोणताही दुजोरा देण्यात आलेला नाही.
काय म्हणाली रुपाली?
मयूरी म्हणाली, ‘माझ्या प्रकरणात महिला आयोगाने काही पावलं उचलली नाहीत या मागे राजकीय दबाव असू शकतो. पोलिसांवरती राजकीय दबाव असू शकतो. माझी एफआयआर घेताना ज्या पोलीस मॅडम माझ्याशी चांगलं बोलत होत्या, त्या दुसऱ्या दिवशी माझ्याशी अरेरावीची भाषा बोलत होत्या.’ दरम्यान, ही तक्रार पोलिसातील महिला कक्षाकडे केली गेली होती. ही तक्रार महिला आयोगाकडे देण्यात आली नव्हती अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
वाचा: वैष्णवीचं बाळ कुटुंबीयांकडे कसं पोहोचलं? काकांनी दिली मोठी माहिती
पुढे ती म्हणाली, ‘मला तर वाटतं त्या चौघांनाही जन्मठेप झाली पाहिजे. वैष्णवीसारख्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. जगातील सर्वच मुली उलटं बोलू शकत नाही. किंवा उलटं उत्तरं देऊ शकत नाही. ज्या प्रकारे मी त्या त्रासाला कंटाळून मी बाहेर आले. तिला नाही निघता आलं. कारण तिच्या नवऱ्यामुळे तिला बाहेर निघता नाही आलं.
महिला आयोगाने आता काय भूमिका घेतली?
वैष्णवीच्या निधनानंतर या प्रकरणावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वैष्णवी हगवणे या विवाहितेने हुंड्यासाठी होणाऱ्या छळामुळे आत्महत्या केल्याच्या दुर्दैवी घटनेची दिनांक 19 मे 2025 रोजी स्वाधिकारे दखल घेतली असून राज्य महिला आयोगाने पुणे पोलिसांना याप्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत, असे चाकणकर यांनी सांगितलं.