राज ठाकरे यांनी शड्डू ठोकला, पुण्यात 3500 ‘राज’दूतांची नेमणूक, मनसेची नेमकी रणनीती काय?

| Updated on: Nov 01, 2022 | 11:53 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतल्याची बातमी ताजी असताना पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.

राज ठाकरे यांनी शड्डू ठोकला, पुण्यात 3500 राजदूतांची नेमणूक, मनसेची नेमकी रणनीती काय?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. महाराष्ट्रातील औद्योगिक प्रकल्प गुजरातला जाण्यावरुन राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या दरम्यान महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता जोमाने कामाला लागल्याचं चित्र आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत पदाधिकारी आणि पक्षाच्या सचिवांची बैठक घेतल्याची बातमी ताजी असताना पुण्यातून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुण्यात मनसे 3500 राजदूत नेमणार आहे. पुण्यातील प्रत्येक सर्वसामान्य नागरीक आणि मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी मनसेने राजदूत ही नवी संकल्पना आणली आहे. या उपक्रमातून मनसे पुण्याच्या प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे.

पुणाचे मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी शहरातील विविध भागातील सर्व पदाधिकाऱ्यांना राजदूत नेमण्याबाबतच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार पुण्यात मनसे संघटनात्मक पातळीवर विभागनिहाय नेमणुका करणार आहे. दर एक हजार मतदारामागे एक राजदूत अशी नेमणूक करण्यात येणार आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात लवकरच राजदूतांची नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पुण्यात मेळावा होईल. या मेळाव्यानंतर लगेच आगामी पुण्याच्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंची भव्य सभा देखील घेतली जाण्याची शक्यता आहे.

हे सुद्धा वाचा

पुणेकरांनी राज ठाकरेंना भरपूर प्रेम दिलंय. पुण्यात एकेकाळी मनसेचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आले आहेत. त्यामुळे राज ठाकरे यांना पुणे शहराकडून आशा आहे. पुण्यात संघटना आणखी मजबूत केली, सर्वसामान्यांपर्यंत आपले कार्यकर्ते पोहोचले तर पक्षाला नक्कीच बळकटी येईल, अशी राज ठाकरेंना आशा आहे. त्यामुळे पुण्यात आता राजदूत नेमण्यात येत आहेत.

राज ठाकरे यांचं पुण्यात राजदूत नेमणं हे आगामी महापालिका निवडणुकांसाठीचं पहिलं पाऊल आहे. त्यापाठोपाठ मनसेला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी देखील तयारी करायची आहे. राज ठाकरे यांच्याबद्दल तरुणांच्या मनात जास्त आकर्षण आहे. त्यामुळे मनसे पक्ष पुन्हा स्थानिक पातळीवर तितक्याच जोमाने सक्रिय झाला तर त्याचा खूप मोठा फायदा हा पक्षाला होऊ शकतो. त्यामुळे राजदूत हा उपक्रम मनसेसाठी फायदेशीर ठरण्याची जास्त शक्यता आहे.