शरद पवारच तेल लावलेले पैलवान, हायकोर्टाचा कुस्तीगीर परिषदेच्या नव्या समितीला दणका

| Updated on: Nov 11, 2022 | 6:28 PM

मुंबई हायकोर्टाने भाजप खासदार रामदास तडस यांना मोठा धक्का देणारा निकाल दिलाय.

शरद पवारच तेल लावलेले पैलवान, हायकोर्टाचा कुस्तीगीर परिषदेच्या नव्या समितीला दणका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे : मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेबद्दलच्या याचिकेवर मोठा निकाल दिलाय. मुंबई हायकोर्टाने कुस्तीगीर परिषदेच्या नवनियुक्त समितीला बरखास्त केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. याआधी भारतीय कुस्ती संघाने शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली समिती रद्द केली होती. त्यानंतर भारतीय कुस्ती संघाकडून भाजप खासदार रामदास तडस यांच्या अधघ्यक्षतेखाली नवीन समिती नियुक्त करण्यात आली होती. महाराष्ट्र केसरी स्पर्धा आपणच भरवण्याबाबत दोन्ही गटाकडून दावा केला जात होता. संबंधित प्रकरण कोर्टात गेलं होतं. अखेर या प्रकरणी मुंबई हायकोर्टाने भाजप खासदार रामदास तडस यांना मोठा धक्का देणारा निकाल दिलाय.

महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवण्यावरुन महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद आणि भारतीय कुस्ती संघ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरुय. विशेष म्हणजे महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार होते. तर बाळासाहेब लांडगे हे सरचिटणीस होते. पण भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर आक्षेप घेतला होता.

भारतीय कुस्ती संघाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेवर भाजप खासदार रामदास तडस यांच्या अध्यक्षतेखाली नवी समिती स्थापन केली होती. पण मुंबई हायकोर्टाने ही नवी समिती बरखास्त केली आहे. त्यामुळे भाजप आणि भारतीय कुस्ती संघासाठी हा झटका मानला जातोय.

हे सुद्धा वाचा

मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेची नवी समिती बरखास्त केल्याने शरद पवार हेच अध्यक्ष राहतील, असं बाळासाहेब लांडगे यांनी स्पष्ट केलंय. महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेकडेच आहे, असं लांडगे म्हणाले आहेत.

“लवकरच महाराष्ट्र केसरी स्पर्धा घोषित करणार. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेवरील आरोप मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावले आहेत. एकूण पाच जिल्ह्यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्यासाठी पत्रक पाठवल आहे. यंदाची महारष्ट्र केसरी पुण्यात होणार नाही”, अशी माहिती बाळासाहेब लांडगे यांच्याकडून देण्यात आलीय.