Mumbai Pune Expressway Traffic Update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम, कल्याण-ठाणे-मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते? सद्यस्थिती काय?

Mumbai Pune Expressway Traffic Update : पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवरील गॅस गळतीमुळे महामार्ग ठप्प झाला आहे. वाहतूक कोंडीतून वाचण्यासाठी ताम्हिणी घाट, माळशेज घाट आणि रेल्वे प्रवासाचे नियोजन कसे करावे, याची सविस्तर माहिती येथे वाचा.

Mumbai Pune Expressway Traffic Update : मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम, कल्याण-ठाणे-मुंबईला जाण्यासाठी पर्यायी मार्ग कोणते? सद्यस्थिती काय?
mumbai pune express way 1
| Edited By: | Updated on: Feb 04, 2026 | 2:57 PM

Mumbai Pune Expressway Traffic Update : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर (Expressway) आडोशी बोगद्याजवळ मंगळवारी सायंकाळी ५ वाजता झालेल्या भीषण अपघातामुळे मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. एका गॅस टँकरला अपघात होऊन त्यातून प्रोफोलीन या अत्यंत ज्वलनशील गॅसची गळती सुरू झाली आहे. या घटनेमुळे सुरक्षेच्या कारणास्तव महामार्गावरील वाहतूक तातडीने रोखण्यात आली आहे. यामुळे परिणामी दोन्ही बाजूंनी १५ ते २० किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर सद्यस्थिती काय?

प्रोफोलीन हा ज्वलनशील पदार्थ घेऊन जाणारा टँकर पुण्याकडून मुंबईच्या दिशेने जात होता. यावेळी चालकाचे नियंत्रण सुटल्याने आडोशी बोगद्याजवळ पलटी झाला. गळती होत असलेला गॅस हवेत वेगाने पसरत असल्यामुळे अग्निशमन दलाने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीज पुरवठा आणि वाहतूक थांबवली होती. ही गळती पूर्णपणे थांबवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक आणि कंपनीचे इंजिनिअर्स घटनास्थळी दाखल झाले आहेत.

सद्यस्थितीत, मुंबईकडे जाणारी एक लेन आणि पुण्याकडे जाणाऱ्या दोन लेन अत्यंत संथ गतीने सुरू केल्या आहेत. मात्र, जुना मुंबई-पुणे महामार्ग (NH-48) देखील एक्सप्रेसवेच्या वाहतुकीमुळे जाम झाला आहे. जर तुम्ही पुण्यातून मुंबईला किंवा मुंबईतून पुण्याला निघण्याच्या तयारीत असाल, तर लोणावळा घाट टाळून खालील मार्गांचा अवलंब करा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

पर्यायी मार्ग कोणते?

  • मार्गे ताम्हिणी घाट (कोकण मार्गे): पुणे → पौड → मुळशी → ताम्हिणी घाट → माणगाव → इंदापूर → पेण → मुंबई. (हा मार्ग थोडा लांबचा असला तरी विनाअडथळा प्रवास होईल).
  • मार्गे माळशेज घाट (कल्याण-ठाणे साठी): पुणे → चाकण → राजगुरुनगर → नारायणगाव → माळशेज घाट → मुरबाड → कल्याण/भिवंडी.
  • भीमाशंकर-मंचर मार्ग: उत्तर मुंबई किंवा पालघरला जाणाऱ्यांनी पुणे → मंचर → जुन्नर या मार्गे माळशेज घाटाकडे वळावे.

प्रशासनाकडून महत्त्वाच्या सूचना

  • एसी (AC) वापरताना काळजी घ्या: गॅस गळती परिसरातून जाताना कारच्या काचा बंद ठेवा आणि एसी इंटरनल एअर सर्कुलेशन मोडवर ठेवावा.
  • इंधनाची टाकी पूर्ण भरा: घाट आणि पर्यायी मार्गावर वाहतूक संथ असल्याने प्रवासाचा वेळ ३ ते ६ तासांनी वाढू शकतो. त्यामुळे पुरेसे इंधन गाडीत असल्याची खात्री करा.
  • पाणी आणि अन्न: लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांना सोबत पुरेसे पाणी आणि कोरडा खाऊ सोबत ठेवणे आवश्यक आहे, कारण पर्यायी मार्गावर सुविधा मिळणे कठीण होऊ शकते.
  • अवजड वाहने: जड वाहनांना तूर्तास फूड मॉल्स आणि महामार्गाच्या कडेला असलेल्या ‘ले-बाय’ मध्ये पार्क करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

रेल्वे हाच सर्वोत्तम पर्याय

सध्याच्या परिस्थितीत रस्ते मार्ग पूर्णपणे अनिश्चित असल्याने पुणे-मुंबई दरम्यान प्रवास करणाऱ्यांनी रेल्वेचा वापर करावा. डेक्कन क्वीन, सिंहगड एक्सप्रेस, इंटरसिटी आणि प्रगती एक्सप्रेस या रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल नाही.