भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक

कुख्यात गुंड गज्या मारणेला अटक करण्यात आली आहे. भाजप कार्यकर्त्याला मारहाण केल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणेला अटक
Gaja Marne
| Updated on: Feb 24, 2025 | 7:04 PM

कोथरुडमध्ये संगणक अभियंता देवेंद्र जोगला मारहाण केल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजानन मारणेला अटक करण्यात आली आहे. १९ फेब्रुवारी रोजी गजा मारणे आणि त्याच्या टोळीविरोधात कारवाई करण्यात आली होती. गजा मारणे घटनास्थळी नसला तरी टोळी प्रमुख असल्यामुळे तो पोलिसांच्या रडारावर आला होता. आता अखेर पुणे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

अभियंता देवेंद्र जोग यांना गज्या मारणे टोळीतील गुंडांनी मारहाण केल्याची घटना १९ फेब्रुवारी रोजी घडली होती. या घटनेची पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दखल घेतली होती. त्यांनी गज्या मारणेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यन्वये (मकोका) कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गज्या मारणेसह साथीदारांच्या मालमत्तांची माहिती पोलिसांकडून संकलित करण्यात आली. तसेच ते वापरत असलेल्या वाहनांची माहिती प्रादेशिक परिवहन विभागाकडून घेण्यात आली.

त्यानंतर मारणे टोळीतील तीन गुंडांना अटक करण्यात आली. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू, किरण कोंडिबा पडवळ आणि अमोल विनायक तापकिर या आरोपिंना अटक करण्यात आली होती. तसेच चौथा आरोपी श्रीकांत उर्फ बाब्या संभाजी पवार हा पसार झाला आहे. मारहाण प्रकरणात टोळी प्रमुख गजानन मारणे यालाही आरोपी करण्यात आले. सर्व आरोपींविरोधात मकोका कारवाई करण्यासाठी कोथरुड पोलिसांनी कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पूर्तता केली. ताकतीने केसचा तपास सुरु केला.

कायद्याचे उल्लंघन करत नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या टोळ्यांना नेस्तनाबूत करण्यासाठी पुणे पोलिसांनी ही भूमिका घेतली आहे. त्यांनी मारणे टोळीचा प्रमुख गजा मारणेला देखील अटक केली आहे. देवेंद्र जोग हे भाजपचे कार्यकर्ते आहेत. त्यांना मारहाण झाल्यानंतर सुरुवातील मारहाणीची कलमे दाखल करण्यात आली होती. पण नंतर तापसणी केल्यानंतर आरोपींविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.