अचानक गाडीला ब्रेक मारणं किती भंयकर ठरु शकतं, पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात

पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघाताची घटना घडली आहे. एका कारचालकाला चौकात वळायचे होते म्हणून त्याने भररस्त्या अचानक गाडीला ब्रेक मारला. पण अचानक ब्रेक मारणे किती धोकादायक ठरु शकते याचा प्रत्यय या घटनेवरुन आला आहे.

अचानक गाडीला ब्रेक मारणं किती भंयकर ठरु शकतं, पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात
पुणे-सातारा महामार्गावर विचित्र अपघात
Image Credit source: TV9
| Updated on: Apr 04, 2023 | 10:35 AM

पुणे / विनय जगताप : पुणे सातारा महामार्गावरील कापूरहोळ गावाच्या हद्दीत सहा वाहनांचा विचित्र अपघात झाल्याची घटना घडली आहे. सहा वाहने एकमेकांवर धडकली. यामध्ये 3 ट्रक, 2 टेम्पो आणि एका कारचा समावेश आहे. पुण्याहून साताऱ्याच्या दिशेने जात असताना समोरील वाहनाने अचानक ब्रेक मारल्यानं मागून येणारी वाहने एकमेकांना धडकली. अपघातात रस्त्यावर थांबलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, वाहनांचं मात्र मोठं नुकसान झालं आहे.

अपघातानंतर या मार्गावरची वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. गाडीला अचानक ब्रेक मारणे किती भयंकर ठरु शकते हे या घटनेवरुन दिसून येते.

कारने अचानक ब्रेक मारल्याने अपघात

पुणे सातारा महामार्गावर साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या एका कारने कापूरहोळ गावच्या हद्दीत अचानक ब्रेक मारला. सोमवारी रात्री साडे नऊच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली. कापूरहोळमधील चौकात त्याला वळायचे होते म्हणून अचानक त्याने कारला ब्रेक मारला. समोरच्या वाहनाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कारच्या मागून वेगात येणारी वाहने अनियंत्रित झाली. यामुळे सहा वाहने एकमेकांवर आदळली.

रस्त्यावर थांबलेले प्रवासी किरकोळ जखमी

या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र रस्त्यावर थांबलेले प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व वाहनांचे मात्र यात मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळित केली.