पुण्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड, सर्वात विश्वासू शिलेदारानेच सोडली साथ, पक्षप्रवेशाची लगबग सुरु

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांनी २७ वर्षांनंतर शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेमुळे नाराज असलेल्या जगतापांनी पवारांच्या बालेकिल्ल्याला मोठे खिंडार पाडले आहे.

पुण्यात पवारांच्या बालेकिल्ल्याला भगदाड, सर्वात विश्वासू शिलेदारानेच सोडली साथ, पक्षप्रवेशाची लगबग सुरु
Prashant Jagtap
| Updated on: Dec 26, 2025 | 2:22 PM

पुण्याच्या राजकारणातील एक आक्रमक चेहरा आणि शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू मानले जाणारे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला रामराम करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. या निर्णयामुळे पुण्यात महाविकास आघाडीतील अंतर्गत समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर आणि शरद पवार गटाचे माजी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्या भूमिकेकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले होते. अखेर त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या निर्णयामुळे पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच शरद पवार गटाला शहरात मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

प्रशांत जगताप यांनी २०१६-१७ या काळात पुण्याचे महापौर म्हणून काम पाहिले आहे. वानवडी परिसरातील नगरसेवक म्हणून त्यांचा दांडगा जनसंपर्क आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर त्यांनी अत्यंत खंबीरपणे शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. पुण्यातील आंदोलने, पक्षाची बाजू मांडणे आणि शहरात संघटना बांधणीत त्यांचा मोठा वाटा होता.

पक्षप्रवेशाचे कारण काय?

आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना जगताप यांनी स्पष्ट केले होते की “मला शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गट या दोन्ही पक्षांकडून सन्मानाने बोलावणे आले आहे. मात्र, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून किंवा इतर तांत्रिक कारणांमुळे मी या दोन्हीकडे न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या पक्षांकडे न जाता काँग्रेसची विचारसरणी जवळची वाटल्याने मी काँग्रेसची साथ देण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती प्रशांत जगताप यांनी दिली होती. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांचे पक्षात स्वागत केले.

पुण्यात नवीन रणनीती आखावी लागणार

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहराध्यक्ष पदावरून मुक्त केल्यानंतर आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागावाटपाच्या मुद्द्यावरून प्रशांत जगताप काहीसे नाराज होते. शरद पवार गटात नवीन नेतृत्वाला मिळणारे प्राधान्य आणि आपली राजकीय कोंडी होत असल्याची भावना यामागे असल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे पुण्यात काँग्रेसला एका आक्रमक आणि महापालिकेत अनुभव असलेल्या नेत्याची गरज होती, जी जगताप यांच्या रूपाने पूर्ण होऊ शकते. पुणे शहरात संघटनात्मक बांधणी करणाऱ्या प्रमुख नेत्यांपैकी एक नेता गेल्यामुळे पवारांच्या राष्ट्रवादीला पुण्यात नवीन रणनीती आखावी लागणार आहे.